'घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं...', राज ठाकरेंवर भाजप-शिवसेनेने चढवला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 18:09 IST2025-03-09T18:06:33+5:302025-03-09T18:09:32+5:30
राज ठाकरेंनी महाकुंभमधील पवित्र स्नानावर टीका करतानाच गंगेचं पाणी तीर्थ म्हणून प्यायला नकार दिला. त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेने आणि भाजपने टीका केली आहे.

'घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं...', राज ठाकरेंवर भाजप-शिवसेनेने चढवला हल्ला
Raj Thackeray News: श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही. नांदगावकरांनी माझ्यासाठी गंगेचं पाणी आणलं होतं, मी म्हणालो हड मी नाही पिणार ते पाणी. लोक अंग घासून अंघोळ करतात. ते पाणी कोण पिणार, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले. त्यांच्या विधानावर शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी टीका केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाकुंभतील पवित्र स्नान आणि गंगेचं दूषित पाणी यावर बोट ठेवत अंधश्रद्धेतून बाहेर या, असे खडेबोल सुनावले.
राज ठाकरेंवर भाजपची टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विधानावर भाजपचे राम कदम यांनी टीका केली. "घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील", असा टोला लगावत राम कदम म्हणाले, "त्या ५७ कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, असा त्याचा अर्थ निघेल. त्या सनातन धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे."
ही काही अंधश्रद्धा-जादूटोणा नाहीये; गिरीश महाजनांचे ठाकरेंना उत्तर
भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "राज ठाकरेंना वाटतं असेल, तर त्यांचं मत वेगळं असू शकतं. पण, मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही. हा काही जादूटोणा नाही. जवळपास ११२ वर्षांनी स्नान घडून येतं आहे. त्याच्यामागे पंचांग आहे. त्याला धार्मिक आधार आहे", अशी टीका महाजनांनी ठाकरेंवर केली.
हा आस्थेचा विषय, श्रीकांत शिंदे यांची राज ठाकरेंवर टीका
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, "आमच्यासाठी तर हा आस्थेचा विषय आहे. ते काय म्हणालेत, ते मी प्रत्यक्षात ऐकलं नाहीये. ऐकल्यानंतर मी बोलेल. पण, मला वाटतं की कुणाच्या आस्थेला ठेच पोहोचेल. त्रास होईल, अशी विधाने लोकांनी केली नाही पाहिजेत."