मुंबईकरांचे श्रद्धास्थान म्हणजे काळबादेवीमधील झवेरी बाजारातील श्री मुंबादेवी मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:39 AM2017-09-28T04:39:06+5:302017-09-28T04:39:10+5:30

साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी हे मंदिर बोरीबंदर परिसरात बांधले होते, परंतु ब्रिटिश राजवटीत मंदिर त्या जागेवरून हलविण्यात आले आणि त्या जागी व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) बांधले व मंदिरासाठी काळबादेवी परिसरात जागा दिली.

Shrim Mumbadevi Temple in Zaveri Bazar in Kalbadevi is the place of worship of Mumbai | मुंबईकरांचे श्रद्धास्थान म्हणजे काळबादेवीमधील झवेरी बाजारातील श्री मुंबादेवी मंदिर

मुंबईकरांचे श्रद्धास्थान म्हणजे काळबादेवीमधील झवेरी बाजारातील श्री मुंबादेवी मंदिर

googlenewsNext

- अक्षय चोरगे।

मुंंबई : मुंबईकरांचे श्रद्धास्थान म्हणजे काळबादेवीमधील झवेरी बाजारातील श्री मुंबादेवी मंदिर. साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी हे मंदिर बोरीबंदर परिसरात बांधले होते, परंतु ब्रिटिश राजवटीत मंदिर त्या जागेवरून हलविण्यात आले आणि त्या जागी व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) बांधले व मंदिरासाठी काळबादेवी परिसरात जागा दिली. दोनशे वर्षांपूर्वी हे मंदिर काळबादेवी येथे बांधले. मुंबादेवीच्या नावावरूनच आपल्या शहराचे नाव मुंबई पडले, अशी आख्यायिका आहे.
मंदिरात श्री मुंबादेवीची नारंगी चेहरा असलेली मूर्ती आहे. मुंबादेवीच्या डाव्या बाजूला श्री जगदंबा देवीची मूर्ती असून, जगदंबेच्या शेजारी अन्नपूर्णा देवीची लहान मूर्ती आहे. मंदिराच्या देखरेखीसाठी १८८८ साली श्री मुंबादेवी मंदिर चॅरिटिज या संस्थेची स्थापना केली. मंदिरात दरवर्षी अश्विन नवरात्रौत्सव आणि चैत्र नवरात्रौत्सव साजरे केले जातात. चैत्र नवरात्रीमध्ये देवीची नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ प्रकारे पूजा केली जाते. होम-हवन आणि विविध धार्मिक विधी केले जातात. चैत्र नवरात्रौत्सवात उत्तर भारतीय मोठ्या संख्येने गर्दी करतात.
अश्विन नवरात्रीत घटस्थापना केली जातात. नवरात्रीत मंदिर रात्री १० ऐवजी ११ वाजता बंद करतात, नेहमीपेक्षा जास्त वेळ भक्तांसाठी ते खुले असते. दररोज भक्तांकडून देवीची विशेष पूजा केली जाते. माघ महिन्यातील एकादशीच्या दिवशी देवीचा जयंती उत्सव, पाटोत्सव (वर्धापन दिन) साजरा केला जातो. या दिवशी मंदिरातून देवीची पालखी निघते. मुंबादेवी मंदिरातून निघालेली पालखी काळबादेवी, पायधुनी परिसरातून फिरून, पुन्हा मंदिरात आणली जाते. या पालखी सोहळ्यामध्ये १० ते १५ हजार भाविक सहभागी होतात.

मंदिरात
चोख सुरक्षा
सध्या नवरात्रीमुळे मंदिरात दररोज लाखांच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. भाविकांसाठी मंदिराबाहेर मंडपाची व्यवस्था केलेली असून, सुरक्षेसाठी ३०० ते ३५० पोलीस तैनात केलेले आहेत, तर मंदिर ट्रस्टकडून १५० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

Web Title: Shrim Mumbadevi Temple in Zaveri Bazar in Kalbadevi is the place of worship of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.