Join us

हॉटेल, बार, समारंभ ठिकाणांची झाडाझडती; माहीममध्ये अनधिकृत हॉटेल सील, कारवाई अधिक तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 2:50 AM

माहीममध्ये अनधिकृत हॉटेल सील, कारवाई अधिक तीव्र

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, समारंभ अशा ठिकाणी पुन्हा झाडाझडती सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात चार पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात येणार असून विकेंडच्या दिवशी ही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. दरम्यान, माहीम येथील कडेल मार्गावरील बेकायदा हॉटेल शनिवारी सील करण्यात आले. तर अन्य ठिकाणच्या धाडसत्रात विनामास्क असलेल्या पाच कर्मचाऱ्यांना दंड करण्यात आला. 

दोन आठवड्यांपासून मुंबईत रुग्णसंख्या वाढू असल्याने पालिकेने मास्कविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. तसेच उपाहारगृहांसह नाइट क्लब, समारंभांवर धाड टाकून नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात चार पथक स्थापन करण्यात आले आहेत. या पथकातील कर्मचारी दररोज किमान पाच ठिकाणी धाड टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अस्थापनावर कारवाई करणार आहे.

दररोज २० हजार चाचण्यापालिकेच्या माध्यमातून दररोज १८ ते २० हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. गुरुवारी २२ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या. 

माहीममध्ये कारवाई...

माहीम केडल मार्गावरील अल लजिज कबाब या अनधिकृत हॉटेल पालिकेच्या जी उत्तर विभागाने सील केले आहे. येथील पाच कर्मचाऱ्यांनी मास्क लावलेले नव्हते. यासाठी त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याच बरोबर माहीम परिसरात सहा हॉटेल आणि रिलायन्स मॉलची पाहणी करण्यात आली. 

जम्बो सेंटरमध्ये सहा हजार खाटा

वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या सात जंम्बो कोविड सेंटरमधील  यंत्रणा पूर्ण क्षमतेने तैनात ठेवण्यात आली आहेत. यासाठी आवश्यक औषधोपचारांसह डॉक्टरांची टीमही तैनात आहे. या ठिकाणी सद्यस्थितीत केवळ एक हजार रुग्ण उपचार घेत आहे. गरज भासल्यास केवळ जंम्बो कोविड सेंटरची खाटांची क्षमता सहापर्यंत वाढवता येणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईपोलिस