शूऽऽऽ...! साप मनुष्यवस्तीत शिरतायत, तापमानवाढीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:13 AM2018-04-03T07:13:30+5:302018-04-03T07:13:30+5:30

शहर आणि उपनगराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उष्णतेचा फटका मानवासह प्राणी-पशुपक्ष्यांनाही बसत आहे. त्यामुळे भूगर्भात राहणारे साप आता मनुष्यवस्तीत शिरू लागले आहेत. सर्प मनुष्यवस्तीत शिरल्याच्या आठवड्यातून किमान सहा ते सात घटना घडत असून, मनुष्यवस्तीत सर्प आढळल्यास त्यांना मारू नका, तर त्यांची माहिती सर्पमित्र अथवा वनविभागाला द्या,

 Shu ...! The snake in the human habitation, the temperature drops | शूऽऽऽ...! साप मनुष्यवस्तीत शिरतायत, तापमानवाढीचा फटका

शूऽऽऽ...! साप मनुष्यवस्तीत शिरतायत, तापमानवाढीचा फटका

Next

- कुलदीप घायवट
मुंबई  - शहर आणि उपनगराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उष्णतेचा फटका मानवासह प्राणी-पशुपक्ष्यांनाही बसत आहे. त्यामुळे भूगर्भात राहणारे साप आता मनुष्यवस्तीत शिरू लागले आहेत. सर्प मनुष्यवस्तीत शिरल्याच्या आठवड्यातून किमान सहा ते सात घटना घडत असून, मनुष्यवस्तीत सर्प आढळल्यास त्यांना मारू नका, तर त्यांची माहिती सर्पमित्र अथवा वनविभागाला द्या, असे आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात आले आहे.
प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनिश कुंजू यांनी याबाबत सांगितले की, वाढत्या उष्णतेचा फटका प्राण्यांनाही बसत आहे. तीव्र तापमानामुळे जमीन तापते. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन बिळात असलेले
साप थंड जागेच्या शोधात बाहेर पडतात. यंदाच्या वाढत्या तापमानाचा धोका सर्पांना बसत असून सर्प मनुष्यवस्तीत शिरल्याच्या दिवसातून किमान एक ते दोन घटना
घडत आहेत.
नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष कौस्तुभ दरवेस यांनी सांगितले, मानव उष्णतेला सामोरे जाण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून, वाढत्या तापमानाशी ‘अ‍ॅडजस्ट’ करून राहत आहे. मात्र, सापांना असा कोणताही पर्याय नाही. अन्नाच्या शोधात तो मानुष्यवस्तीमध्ये येतो.

मनुष्य वस्तीत कोठे आढळतात साप?
पाण्याची टाकी, बाथरूम, शौचालय, झाडांचे पार, रेती-दगड ठेवलेल्या ठिकाणी, सोसायटीच्या बागेत, नाल्याशेजारी, कचरापेटीच्या ठिकाणांचा साप आश्रय घेतात.

सततची जंगलतोड, वाढती लोकसंख्या, वाढते सिमेंटचे जंगल, झाडे तोडल्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. बदलत्या तापमानाचा परिणाम सापांवर होत आहे. वणवा लागल्यामुळे जमीन तापते. त्यामुळे साप थंड जागेच्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी जातात. विकासात्मक कामे करताना पर्यावरणाचा कोणताही विचार केला जात नाही. त्यामुळे अन्नसाखळी विस्कळीत होत आहे.
- डी. स्टॅलिन,
प्रकल्प संचालक, वनशक्ती

रॉ संघटनेचे संस्थापक, मानद वन्य जीवरक्षक पवन शर्मा यांनी सांगितले, साप हा थंड जागेवर राहणारा प्राणी आहे. सापाचे रक्त थंड असते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि अन्न पचविण्यासाठी साप थंड जागेच्या शोधात असतो. अशा वेळी पाण्याची टाकी, पाणथळ भागात साप दिसून येतो. मनुष्य वस्तीत साप आढळ्यास त्याला मारू नये, तर सर्पमित्रांशी संपर्क साधावा.

साप दिसल्यास येथे साधा संपर्क -
वन विभाग हेल्प लाईन : १९२६
पॉज संघटना : ९८३३४ ८०३८८ (पवई, दहिसर, गोरेगाव विभाग)
नॅचरल हिस्ट्री सोसायटी : ९७०२६ ७१८८१ ( ठाणे, मुलुंड, भांडुप विभाग)
रॉ संघटना : ९८६९७ ८०२०२, ७६६६६ ८०२०२ (विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला विभाग)

मुंबईत मण्यार, डुरक्या घोणस प्रजातींच्या सर्पांचे प्रमाण अधिक आहे. नाग, घोणस, मण्यार हे विषारी साप आहेत. धामण, सवत्या, डुरक्या घोणस हे बिनविषारी साप आहेत. हरणटोळ, मांजऱ्या अशा प्रजातीतील सर्प हे निमविषारी (मानवी शरीराला हानीकारक नसलेले विष) आहेत.
उन्हाळ्याचा पशुपक्षी, सरपटणाºया प्राण्यांना मोठा त्रास होतो.
मनुष्य वस्तीत एखादा साप आढळून आल्यास त्याला मारू नका. तसेच जखमी अवस्थेत प्राणी, पक्षी दिसून आल्यास प्राणिप्रेमींशी संपर्क साधावा. शहरामध्ये अनेक ठिकाणी साप दिसून येत आहेत. नागरिकांनी साप दिसल्यास त्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधावा. नागरिकांनी सापावर लांबूनच लक्ष ठेवून फोटो (कॅमेºयाचा फ्लॅश
बंद ठेवून) काढावा. हा फोटो सर्पमित्राला पाठवून साप कोणत्या प्रजातीचा आहे, याचा अंदाज घेता येतो.

...अन् सापांना मिळाले सर्पमित्रांमुळे जीवदान

पवई येथील आयआयटीच्या परिसरातील गणेशघाट पदपथावर विसाव्याच्या शोधात आलेल्या नाग आणि धामण यांना नागरिकांच्या आणि सर्पमित्रांच्या मदतीने सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. साडेपाच फूट लांबीच्या नागाला आणि धामणला पकडल्याची माहिती वनविभागाला देऊन त्यांना सुरक्षितस्थळी सोडण्यात आले.
पवई येथील आदि शंकराचार्य मार्गावरून रिक्षाचालक
योेगेश लोखंडे यांना पदपथावर स्लेंडर कोरल प्रजातीचा नाग आढळला. लोखंडे यांनी नागावर लक्ष ठेवून पॉज संघटनेला फोन करून त्वरित माहिती दिली. सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नागाला ताब्यात घेतले.

नागरिकांनी आयआयटी परिसराजवळील कबूतरखाना येथे धामण पाहिली असता, तिला पकडण्यात यश आले. नाग आणि धामण यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आल्याचे मुंबई प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनिश सुब्रमण्यन कुंजू यांनी सांगितले.

Web Title:  Shu ...! The snake in the human habitation, the temperature drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई