शुभमंगल ‘सावधान’! लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 04:00 AM2020-12-10T04:00:19+5:302020-12-10T04:02:59+5:30
marriage News : होणारा नवरदेवच निघतोय ठग ; आमिष दाखवून लैंगिक अत्याचारांचेही बळी
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीबरोबर लैंगिक अत्याचाराच्या घटना डोके वर काढत आहे. फेसबुक, इंस्टाग्रामसह विवाह संकेतस्थळावरून अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे.
मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान स्ट्रीट क्राइमबरोबर अन्य गुन्ह्याप्रकरणी ४४ हजार ४९८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. बँक, तसेच पेटीएम अधिकारी असल्याचे सांगून फसवणुकीबरोबरच लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत.
फसवणुकीच्या दिवसाला दोन ते तीन घटना घडत आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनाही समोर येत आहे. मुंबईत गेल्या १० महिन्यांत १८ वर्षांवरील तरुणी, महिलांवरील बलात्कारप्रकरणी २५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ३८ घटनांचा समावेश होता. यातील काही घटना या लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या आहेत, तर काही घटनांमध्ये शारीरिक संबंधांचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नावाखाली पैसेही उकळण्यात येत आहेत.
तर सोशल मीडियावरील फेक अकाउंट, मॉर्फिंग, ईमेल्स आणि एसएमएसप्रकरणी ६१ गुन्हे नोंद आहेत. यापैकी ३१ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, मुंबईत २०१९मध्ये विविध फसवणुकीप्रकरणी ४,६४२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, ५ हजार ५३४ जणांची यात फसवणूक करण्यात आली आहे. यात, गंडविल्याप्रकरणी ५२३ गुन्हे नोंद आहेत.
गप्पा नाही गप्प!
‘कोणी आपल्या पासवर्डबद्दल विचारल्यास वेळीच आपला आवाज ‘म्यूट करा,’ असे आवाहन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विटरवरून केले आहेत. अनेकदा सोशल मीडियावर मैत्री होते. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच, ठगाकड़ून गोपनीय माहिती मिळवून त्याद्वारे खात्यावर डल्ला मारण्याबरोबरच ब्लॅकमेलिंगच्या घटनाही वाढत आहेत.
पोलिसाविरुद्धही गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलीस दलातील एका उपनिरीक्षकाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावरील मैत्रीपासून सावधान
अल्पवयीन मुली, तरुणीसह ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांसोबत सोशल मीडिया, तसेच विवाह संकेत स्थळावरून ओळख करायची. मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे.
सावज जाळ्यात येताच लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करायची, अशा घटना वाढत आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करण्यापूर्वी खातरजमा करा, असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.