Join us

पाणीकपातीवरून गदारोळ

By admin | Published: October 09, 2015 3:16 AM

मुंबईत लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीनंतर शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी पाण्याअभावी आतापासून चटके बसू लागले आहेत. यावर प्रशासन काहीच

मुंबई : मुंबईत लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीनंतर शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी पाण्याअभावी आतापासून चटके बसू लागले आहेत. यावर प्रशासन काहीच उपाययोजना करत नसल्याने अखेर याप्रश्नी विरोधकांनी गुरुवारी घोषणा देत महापालिका सभागृह दणाणून सोडले. पाणीकपातीच्या प्रश्नावर सत्ताधारी चर्चा करत नसून, महापौरदेखील चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करत सुमारे पाऊण तास विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालणे सुरूच ठेवले.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांत कमी पाऊस झाला आहे. परिणामी भविष्यातील पाण्याच्या नियोजनाचा विचार करत प्रशासनाने निवासी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी अनुक्रमे २० आणि ५० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र पाणीकपात लागू करण्यापूर्वी पूर्व आणि पश्चिम उपनगरातील ज्या भागात पूर्वीपासूनच कमी पाणी येत होते; अशा ठिकाणांवरील पाण्याचा दाब आणखी कमी झाला आहे. विशेषत: पश्चिम उपनगरातील कांदिवली, गोरेगाव तर पूर्व उपनगरातील भांडुपसारख्या परिसरातील रहिवाशांना पाण्याच्या कमी दाबाला सामोरे जावे लागत आहे.आजघडीला सातही तलावांचा एकूण पाणीसाठा ११ लाख ६१ हजार ४३५ दशलक्ष लीटर्स एवढा आहे. १ आॅक्टोबर रोजी सातही तलावांचा एकूण साठा १४ लाख दशलक्ष लीटर्स असणे अपेक्षित होते. परंतु आता पावसाने माघार घेतल्याने पाणीसाठा वाढण्याची शक्यता नाही. मुंबईत लागू झालेली पाणीकपात आता वर्षभर कायम राहण्याचीच शक्यता आहे. या निर्णयावर लवकरच प्रशासनाकडून शिक्कामोर्तब होऊ शकते. परंतु तरीही ज्या क्षेत्रात पाण्याची चणचण आहे अशा क्षेत्रातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी स्थायी समिती बैठक किंवा महापालिका सभागृहात चर्चा होणे आवश्यक आहे. सत्ताधारी सकारात्मक चर्चेसाठी वेळच देत नसल्याचा आरोप विरोधकांनी गुरुवारी सभागृहात केला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, सपाचे रईस शेख आणि मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांच्यासह विरोधी पक्षांतील सदस्यांनी पाणीप्रश्नावरून सभागृह डोक्यावर घेतले. दिलीप लांडे यांनी तर महापौर स्नेहल आंबेकर यांना रस्ते प्रश्नांवरून पुष्पगुच्छ दिल्याने सभागृहातील वातावरण आणखीच तापले. विरोधी सदस्यांनी यावर गोंधळ घालत; मुंबई का महापौर कैसा हो? स्नेहल आंबेकर जैसा हो, स्नेहल आंबेकर आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा उपहासात्मक घोषणा देत पाऊण तास गोंधळ सुरूच ठेवला. (प्रतिनिधी)