मुंबईच्या आयुक्तपदी शुक्ला की परमबीर सिंग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 06:36 AM2019-08-30T06:36:09+5:302019-08-30T06:36:33+5:30
बर्वे यांना मुदतवाढीची आशा; आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख असलेल्या पोलीस महासंचालक यांच्याहूनही अधिक वलय लाभलेल्या मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे पोलीस वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. महिन्याअखेरीस निवृत्त होत असलेले आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची आशा कायम असली तरी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे.
गृह विभागाची धुरा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबत अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार असून सध्याच्या घडीला रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर आहे. शनिवारी सकाळी अधिकृत निवड केली जाईल, असे मुख्यमंत्री कार्यालयातील अतिवरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. बर्वे यांच्या मुदतवाढीबद्दल गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणताही प्रस्ताव बनविण्यात आला नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
आयपीएसच्या १९८७ च्या बॅचचे संजय बर्वे यांनी २८ फेबु्रवारीला दुपारी मुंबई पोलीस दलाच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. ३१ आॅगस्टला ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे जेमतेम सहा महिने मिळाल्याने त्यांना आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात असली तरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार हे धाडस करणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचे वारसदार म्हणून थेट १९८८ च्या बॅचचे आयपीएस असलेले परमबीर सिंग व रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे.
परमबीर सिंग यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून ३ वर्षांहून अधिक वर्षे काम सांभाळले आहे. धडाडीचे आणि ‘प्रॅक्टिकल’ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाय सत्तेतील दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सोहार्दाचे संबंध असल्याचे सांगितले जाते. तर रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे आयुक्त म्हणून कामकाज पाहिले आहे. त्याशिवाय राज्य गुप्त वार्ता विभागाचे प्रमुख म्हणूनही अनेक वर्षे जबाबदारीने काम केले आहे. त्यामुळे त्या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील अधिकारी असल्याचे सांगितले जाते. पदोन्नती देऊन त्या मुंबईत आयुक्त बनल्यास पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळणार आहे.
अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांत नाराजी
राज्य पोलीस दलात सध्या महासंचालक दर्जाची आठ पदे मंजूर असून पोलीस महासंचालकांनंतर मुंबईचे आयुक्त पद हे सेवा ज्येष्ठतेमध्ये दुसºया क्रमांकाच्या अधिकाऱ्यांकडे दिले जात होते. मात्र २८ फेबु्रवारीला राज्य सरकारने ही पद्धत डावलून संजय बर्वे यांना आयुक्त केले. तर त्यानंतर महत्त्वाच्या समजल्या जाणाºया एसीबीच्या प्रमुख पदी परमबीर सिंग यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली. डीजीपीनंतर सर्वांत ज्येष्ठ अधिकारी असलेल्या संजय पांडे यांच्यावर सरकारची ‘वक्र’दृष्टी कायम असल्याने ते गेल्या चार वर्षांपासून ‘होमगार्ड’मध्येच आहेत. त्यांच्यानंतर १९८७ च्या बॅचचे ‘पोलीस हाउसिंग’चे बिपीन बिहारी, तुरुंग विभागाचे सुरेंद्र पांडे, सुरक्षा महामंडळाचे डी. कनकरत्नम, विधि व तंत्र विभागाचे हेंमत नागराळे हे ज्येष्ठ महासंचालक आहेत. मात्र यापैकी कोणालाही मुंबईच्या आयुक्तपदासाठी संधी दिली जात नसल्याने ते नाराज आहेत. परंतु राज्यकर्त्यांशी पंगा नको, म्हणून याबद्दल उघडपणे कोणी नाराजी व्यक्त करीत नसल्याची परिस्थिती आहे.