मुंबापुरीतील बाजारपेठांत शुकशुकाट
By admin | Published: November 16, 2016 05:08 AM2016-11-16T05:08:09+5:302016-11-16T05:08:09+5:30
चलनाच्या समस्येचा फटका सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गालाही बसला आहे. मुंबईतील किरकोळ व्यापाऱ्यांपासून घाऊक व्यापारी आणि हॉटेल चालकापासून
मुंबई : चलनाच्या समस्येचा फटका सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गालाही बसला आहे. मुंबईतील किरकोळ व्यापाऱ्यांपासून घाऊक व्यापारी आणि हॉटेल चालकापासून वेटरपर्यंत सर्वांनाच नोट संक्रमण काळाचा फटका बसत आहे.
जंक फूडपेक्षा स्टेशनजवळ, आॅफिसखाली असणाऱ्या अण्णाच्या एक प्लेट इडली-मेंदुवड्याचा भरपेट नाश्ता अगदी १२ रुपयांत मिळत असल्याने त्याला अनेक जण पसंती देत आहेत. म्हणूनच सकाळी ६ वाजल्यापासून इडलीवाल्या अण्णाच्या हाती असलेल्या भोंग्याचा आवाज गल्लीबोळांमध्ये ऐकायला मिळत असतो. असे असले तरी इडलीचे मोठे भांडे घेऊन फिरणाऱ्या अण्णांचा धंदाही गेल्या काही दिवसांपासून मंदावला आहे. त्यात १२ रुपयांसाठी सुटे पैसे देताना विक्रेत्यांची अडचण होत आहे. ग्राहक रोडावल्याने तयार केलेला माल संपवायचा तरी कसा? यासोबतच धंदा बंद केल्यास पुन्हा लोकांची विश्वासार्हता मिळवायची कशी? अशा द्विधा मन:स्थितीत इडली विक्रेते आहेत.
मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या हॉटेलचीही तीच अवस्था आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता बहुतेक हॉटेलांतील गर्दी ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे वरळीतील हॉटेल चालक जयकर शेट्टी यांनी सांगितले. शेट्टी म्हणाले की, पहिल्या चार दिवसांत धंदा खूपच कमी झाला होता. रविवारी हॉटेल हाऊसफुल असायचे, मात्र या रविवारी हॉटेलात म्हणावी तितकी गर्दी नव्हती. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
कुणी पाव घेते का पाव!
१० ते १२ रुपयांच्या पावाच्या लादीपेक्षा आॅफिसला जाताना प्रवासात सुटे पैसे कामी येतील, असे म्हणत लोक पाव खरेदी करीत नाहीत. एरव्ही सकाळी १० वाजल्यानंतर बेकरीत पाव शिल्लक राहत नव्हते. मात्र आत्ता पावाच्या लाद्या शिल्लक राहत आहेत.
- करीम खान, बेकरी चालक
गुमास्ता कामगारांचे अच्छे दिन!
च्कपडा बाजारातील मुंबई गुमास्ता युनियनचे संपतराव चोरगे म्हणाले की, येथील काही कपडा व्यापाऱ्यांनी गुमास्ता कामगारांना तीन महिन्यांचा आगाऊ पगार दिला आहे. मात्र रोखीने पगार देताना सर्व जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा देण्याची चलाखी व्यापाऱ्यांनी केली आहे.
च्याशिवाय काही व्यापारी कामगारांच्या बँक खात्याचा वापर जुन्या नोटा भरून नव्या नोटा काढण्यासाठी करत आहेत. त्याबदल्यात काही कामगारांना एक लाख रुपयांमागे १० हजार रुपयांचा मोबदलाही देण्यात येत असल्याचे गुमास्ता कामगार युनियनचे संपतराव चोरगे यांनी सांगितले.
टीपवरही ग्राहकांची नजर
हॉटेलमध्ये जेवण किंवा नाश्ता केल्यानंतर ग्राहक बिल भरताना उरलेले सुटे पैसे वेटरला टीप म्हणून देतात. त्यानुसार रोजचे किमान २०० ते २५० रुपये जमतात. मात्र गेल्या चार दिवसांपासून १०० रुपयांची टीप मिळणेही कठीण झाले आहे, असे वेटर रामबाबू चौपाल याने सांगितले.
हातगाडीविक्रेत्यांना सुट्ट्या पैशांचे ग्रहण
इमारतीच्या गेटपर्यंत नागरिकांना गरजेच्या वस्तू पुरविण्यासाठी हातगाड्यांद्वारे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचाही धंदा गेल्या काही दिवसांपासून मंदावला आहे. पाववाला, भाजीवाला, कांदे-बटाटेवाले, भेळवाले असे कितीतरी विक्रेते हातगाडीवरून मुंबई आणि उपनगरात दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी फिरत असतात. मात्र त्यांनाही नोट संक्रमणाचा चांगलाच फटका बसला आहे.
कॉर्पोरेट्समध्येही उधारी
गेल्या मंगळवारपासून हातात किरकोळ पैसे येत आहेत. मिळालेल्या पैशांतून पुन्हा सामान आणायचे असते. त्याचेही पैसे सुटत नाहीत. त्यामुळे बचत केलेले पैसे सामानासाठी वापरावे लागत आहेत. कमाई नसल्याने कुर्ल्यातील कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांना महिन्याच्या क्रेडिटवर इडली देत आहे.
- मारुथी मुरुगन, इडली विक्रेता