आवाज बंद कर डीजे तुला आईची शप्पथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 05:49 AM2019-09-01T05:49:01+5:302019-09-01T05:49:06+5:30

विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही राजकारणी मंडळींशी निगडीत असतात.

 Shut up, DJ swears you mom! ganesh festival | आवाज बंद कर डीजे तुला आईची शप्पथ!

आवाज बंद कर डीजे तुला आईची शप्पथ!

Next

गणेशोत्सवात तरुणाईच्या उत्साहाला जसे भरते येते, तसेच अनेकांच्या काळजात धस्सही होते. कारण एकच डीजेचा धडकी भरवणारा दणदणाट! खरे तर डीजे हद्दपारच करायला हवा; ते नाही जमले, तर गणेश मंडळांनी आवाजाची मर्यादा आपणहून पाळावी, असे वाचकांनी अत्यंत नम्रपणे सुचविले आहे.

मंडळांनी नियम पाळावेत
गणेशोत्सवाचे स्वरूप आता मोठे विस्तारले असून, मंडळांची आणि पर्यायाने मिरवणुकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे एकूणच गोंगाट वाढला आहे. विवाह समारंभ, दिवाळी उत्सव, नवरात्र हे हिंदूंचे सण असले, तरी इतर धर्मियांचेही उत्सव आहेत. त्यामध्येही गोंगाट होतो. त्या सर्वांसाठीच शासनाने काही नियम केले आहेत. किमान ते सर्वांनीच पाळले, तरी ध्वनिप्रदूषण कमी होईल. कोणत्याही वाद्यावर बंदी घालण्याची गरज भासणार नाही.
- नटवरलाल गांधी, आमगाव, जि. गोंदिया.

ध्वनिप्रदूषणावर निर्बंध हवेच
डीजेचा कर्णकर्कश आवाजात लाजीरवाण्या गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईला ध्वनिप्रदूषणामुळे होणारी हानी कळत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने ‘नॉइज मॅपिंग’ करून, योग्य कार्यवाही करण्याचे दिलेले आदेश कधीच पाळले जात नाहीत. धार्मिक उत्सावाला जेंव्हा राजकीय किनार लाभते तेंव्हा सामाजिक हिताचा कैवार घेऊन त्याच्या दुष्परिणामाकडे दुर्लक्ष करणे, ही भारतीय राजकीय मानसिकता आहे. रात्री दहापर्यंत स्पीकर चालू ठेवण्याच्या न्यायालयीन आदेशाला डावलून राज्य सरकार जर,पाच दिवस उशिरापर्यंत डीजे वाजवू शकत असल्याची सवलत जाहीर करीत असेल तर न्यायालयाच्या आदेशाला केराच्या टोपलीत बंद केले असाच त्याचा अर्थ होत नाही का? उत्सव साजरे करताना संवेदनशीलता जपायला हवी. ध्वनिप्रदूषणाच्या आवाजाला मयार्दा हवीच.
- डॉ. नूतनकुमार सी.पाटणी,
चिकलठाणा, औरंगाबाद.

डीजे हद्दपार करा
गणेशोत्सवामध्येच नव्हे तर कोणताही उत्सव, सण किंवा लग्नसमारंभासारखे कार्यक्रम असोत सर्वत्र डीजेवर बंदीच घातली पाहिजे. गणेश उत्सवाच्या १० दिवसांमध्ये डीजेचा जास्तच त्रास होतो. सरकारने आवाजाची घालून दिलेली मर्यादा कोणीही पाळत नाही. गुन्हा दाखल होतात आणि यथावकाश मागेही घेतले जातात. पर्यावरणाला घातक असणाºया डीजे, फटाके, अशांसारख्या सर्वच आवाजावर बंदी घातली पाहिजे.
- माधुरी विजय रानभरे,
गुरुवार पेठ, कासार गल्ली,
कराड, जि. सातारा.

एक ढोल किंवा एक साउंड बॉाक्स संकल्पना राबवा
विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही राजकारणी मंडळींशी निगडीत असतात. उत्सव साजरा करताना मी मोठा का तू मोठा, या अविभार्वात कार्यक्रम आखतात. अलिकडे सरकारने डीजेवर काही निर्बंध लादल्याने पारंपरिक वाद्यांच्या नावाखाली पन्नास ते शंभर ढोल असणारे पथक तयार करून डीजे पेक्षा जास्त आवाज करतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणात शंभर डिसेबल आवाज निघतो ध्वनिप्रदूषण होते पण धार्मिक उत्सव फक्त दहा दिवसच या नावाने सर्वच झाकले जाते. एक गाव एक गणपती, एक ढोल किंवा एक साऊंड बॉाक्स संकल्पना राबवायला हवी.
- अनिल बबन सोनार,
उपळाई बुद्रुक, माढा, जि. सोलापूर.

आरोग्यावर दुष्परिणाम
कर्णकर्कश डीजेच्या ध्वनिप्रदूषणामुळे लोकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. खरेतर निवासी क्षेत्रात ५५ डेसीबल पुढे ध्वनीची पातळी गेल्यास त्याचा परिणाम लहान मुले, वृद्ध, आणि रुग्णांवर फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राणी, पक्ष्यांनासुद्धा खूप त्रास होतो. यासाठी शासनाने ध्वनी प्रदूषणाविरोधात ठोस पावले उचलावी. अलाहाबाद न्यायालयाने अलीकडच्या काळात पाच वर्षे कैद व एक लाख रुपये दंड असा कडक कायदा केला आहे. थोडाबहुत अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकारने करावा. शेवटी कोणताही प्रश्न कायदा किंवा शिक्षा करून पूर्णपणे मिटत नाही, त्यासाठी लोकजागृतीची नितांत गरज आहे.
- तानाजी सयाजी म्हेत्रे,
पिंपळा (बु), तुळजापूर, जि. उस्मानाबाद.

Web Title:  Shut up, DJ swears you mom! ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.