Join us

काेळशावरील तंदूर बंद करा; भट्ट्यांमध्ये करावा लागणार पर्यायी इंधनाचा वापर; पालिकेची ८४ हॉटेलांना ८ जुलैची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 05:01 IST

शहरातील वायूप्रदूषण कमी व्हावे, यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

मुंबई : शहरातील वायूप्रदूषण कमी व्हावे, यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार ८ जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा, उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेकने दिला आहे. आतापर्यंत ८४ ढाबे, रेस्टॉरंट, हॉटेलला महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.

खवय्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे कोळशाच्या भट्टीत भाजलेली तंदूर रोटी. मात्र कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना महापालिकेने नोटीस बजावल्यामुळे आता कोळसा भट्टीतील तंदूर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही. आता कोळशाऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. यापुढे, मुंबईतील एकही बेकरी आणि धाबा आता जळाऊ लाकडावर चालणार नाही, त्याऐवजी सीएनजी, पीएनजी वापरावे असे आदेशच आयुक्तांनी सर्व बेकरी चालक, रेस्टॉरंट आणि धाबा चालकांना दिले आहेत. तसेच हॉटेलचालकांनी ८ जुलैपर्यंत कोळसा तंदूरभट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही या नोटिशीतून दिला आहे.

ग्रीन एनर्जीचा वापर अनिवार्य

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाकूड, कोळसा वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे, कोळसा तंदूर भट्टीचा वापर करणाऱ्या हॉटेल मालकांना आता हॉटेलमध्ये बदल करून इलेक्ट्रिक एलपीजी, पीएनजी, सीएनजी व इतर ग्रीन एनर्जीचा वापर करावा लागणार आहे.

कारवाईचा इशारा

विशेष म्हणजे, मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि धाबाचालकांची संख्या १ हजारांच्या पुढे असून बहुतांश चालक हे विद्युत उपकरणांचा वापर करतात. मात्र, अनेकजण अद्यापही जुन्याच पद्धतीचा अवलंब करत असून धाब्यांवर सर्रासपणे कोळसा भट्टीचाच वापर केला जातो. त्यामुळे, महापालिकेने याची दखल घेतली आहे. रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :मुंबई