लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली (प.) लिंक रोड, सी.टी.एस. क्र. १४९० वर नाविकास क्षेत्रात, निवासी क्षेत्राच्या जवळ, शासकीय नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या प्रस्तावित आरएमसी प्लांटमुळे सुमारे २५०० नागरिक त्रस्त झाले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सभोवतालच्या निवासी क्षेत्रात नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता १०० मीटर अंतरावर बफर झोन उभारण्यात आलेला नाही.
या प्लांटवर धूर हवेत न पसरण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्याची कोणतीही व्यवस्था आढळून येत नाही. तसेच सभोवताली झाडे व भिंत उभारण्यात आलेली नाही. हा आरएमसी प्लांट सुरू झाल्यानंतर होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांना श्वसनविकार, खोकला, सर्दी इ. आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सदर आरएमसी प्लांटचे काम तातडीने बंद करावे, अशी मागणी शिवसेना सचिव सूरज चव्हाण व विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य-सचिव अशोक शिनगारे (आयएएस) यांची भेट घेऊन केली.
सदर प्लांटची मंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाईल. प्लांट चालकाने नियमांचा भंग केला असेल व त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असेल तर त्याच्यावर प्लांट बंद करणे अथवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे अशी करणे, अशा प्रकारे कठोर कारवाई केली जाईल अशी सकारात्मक भूमिका अशोक शिनगारे यांनी मांडली. या स्थानिक नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.