कर मागे घेईपर्यंत बंद सुरू राहणार

By Admin | Published: March 10, 2016 03:42 AM2016-03-10T03:42:34+5:302016-03-10T03:42:34+5:30

केंद्रीय अर्थ संकल्पात सोन्यांच्या दागिन्यांवर लादलेल्या अबकारी कराविरोधात मुंबई होलसेल गोल्ड ज्वेलर्स असोसिएशनने बुधवारी आझाद मैदानात मोर्चा काढला.

The shutdown will continue until the tax is withdrawn | कर मागे घेईपर्यंत बंद सुरू राहणार

कर मागे घेईपर्यंत बंद सुरू राहणार

googlenewsNext

मुंबई : केंद्रीय अर्थ संकल्पात सोन्यांच्या दागिन्यांवर लादलेल्या अबकारी कराविरोधात मुंबई होलसेल गोल्ड ज्वेलर्स असोसिएशनने बुधवारी आझाद मैदानात मोर्चा काढला. अबकारी कर रद्द होत नाही, तोपर्यंत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला सराफांचा बंद सुरूच राहील, असा इशारा इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) अध्यक्ष मोहित कंबोज यांनी यावेळी दिला.
कंबोज म्हणाले की, ‘अबकारी कर रद्द होत नाही, तोपर्यंत सराफांनी हे आंदोलन सुरूच ठेवायचे आहे. आंदोलन काळात एकही दुकान उघडणार नाही, याची काळजी सराफांनी घ्यावी. जो सराफ दुकान उघडेल, त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. यापुढे बहिष्कार टाकलेल्या सराफांच्या मदतीसाठी संघटना कधीही पुढे येणार नाही. बहिष्कृत सराफांना कोणत्याही पुरस्कार किंवा सांस्कृतिक सोहळ््याचे आमंत्रण दिले जाणार नाही,’ असेही कंबोज यांनी या वेळी घोषित केले.
त्या आधी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी सराफांच्या अडचणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मांडण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी आजच दिल्लीला रवाना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक आमदार राज पुरोहित उपस्थित होते.
पंतप्रधानांनी लक्षात ठेवावे
सराफांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे प्रमुख होण्यासाठी मदत केली आहे, असे वक्तव्य कंबोज यांनी केले. ते म्हणाले की, ‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. म्हणूनच काही पक्षांकडून अबकारी कर रद्द करण्याचे निवेदन अर्थमंत्र्यांना देऊन आंदोलनाचे श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू आहे. मात्र, आंदोलनात राजकीय पक्षाला प्रवेश करू देणार नाही. भाजपाने चूक केली असेल, तर ती निस्तरण्याचे कामही भाजपच करेल. त्यासाठी भाजपाचे सदस्यत्व आड येत असेल, तर त्याचा विचारही केला जाणार नाही,’
असा इशाराही कंबोज यांनी
दिला. (प्रतिनिधी)

Web Title: The shutdown will continue until the tax is withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.