नियम न पाळता अनेक ठिकाणी बंद शटरआड व्यवसाय सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:06 AM2021-04-25T04:06:45+5:302021-04-25T04:06:45+5:30

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागल्याने शासनाच्या वतीने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध ...

Shutter business continues in many places without following the rules | नियम न पाळता अनेक ठिकाणी बंद शटरआड व्यवसाय सुरूच

नियम न पाळता अनेक ठिकाणी बंद शटरआड व्यवसाय सुरूच

Next

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागल्याने शासनाच्या वतीने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यात हल्लीच किराणा व फळभाज्यांची दुकाने सकाळी ७ ते ११ या चार तासांच्या वेळेतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी देखील मुंबईत अनेक ठिकाणी बंद शटरच्या आडून दुकानदारांचा व्यवसाय सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पोलिसांची गाडी येताच दुकाने बंद करण्यात येतात. मात्र पोलीस निघून जाताच पुन्हा एकदा बंद शटरच्या आडून दुकाने सुरू करण्यात येतात. यामुळे या निर्बंधांचे नागरिकांकडून पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बंद शटरच्या आडून व्यवसाय सुरू असल्याचे नागरिकांना देखील माहीत असल्याने नागरिक देखील बंद दुकानांच्या बाहेर गर्दी करून उभे असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. यामध्ये किराणासामान, कपड्यांची दुकाने, हार्डवेअर, भांड्यांची दुकाने, चपलांची दुकाने, मोबाइल रिपेरिंग, गाड्यांचे स्पेअर पार्ट अशा सर्व दुकानदारांचा समावेश आहे.

गाड्यांची दुरुस्ती करण्यासाठी तसेच लग्नासाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याने ते त्यांना लागणाऱ्या वस्तूंची मागणी करतात. त्यामुळे आम्हाला बंद शटर आडूनही व्यवसाय सुरू ठेवावा लागत असल्याचे. या दुकानदारांचे म्हणणे आहे. मात्र अशाने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना कोरोनाची भीती नसल्याचे दिसून येत आहे.

जस्विंदर सिंग (सायन कोळीवाडा) - लॉकडाउन असला तरीदेखील रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू आहे. यामुळे नागरिक गाड्यांच्या दुरुस्तीसाठी दुकानावर येतात. दुकानावर कामगार कामाला असल्यामुळे त्यांना पगार द्यावा लागतो. त्याचप्रमाणे आमचा उदरनिर्वाह या दुकानावर आहे. त्यामुळे बंद शटर आडून आम्हाला व्यवसाय सुरू ठेवावा लागत आहे.

किशोर शिंदे (कुर्ला पूर्व) - ७ ते ११ या वेळेत सर्व नागरिकांना घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घेणे जमत नाही. यामुळे अनेक नागरिक त्यानंतरही दुकानावर येत राहतात. यामुळे आम्हाला बंद शटरच्या आडून किराणा मालाच्या वस्तू ग्राहकांना द्याव्या लागतात.

Web Title: Shutter business continues in many places without following the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.