पूर्व उपनगरात वादविवादानंतर शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:07 AM2021-04-07T04:07:01+5:302021-04-07T04:07:01+5:30
मुंबई : शासनाच्या नव्या नियमांबाबत व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे पूर्व उपनगरातही वादविवादानंतर अखेर पोलिसांनी सर्वांना शटर डाऊन करण्यास सांगितले. त्यात ...
मुंबई : शासनाच्या नव्या नियमांबाबत व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे पूर्व उपनगरातही वादविवादानंतर अखेर पोलिसांनी सर्वांना शटर डाऊन करण्यास सांगितले. त्यात दुपारनंतर भाजी मार्केट, महत्त्वाच्या रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळाला.
मुलुंडच्या एम.जी. रोड, म्हाडा कॉलनी, भाजी मार्केट, स्टेशन परिसरात सकाळच्या सुमारास दुकाने सुरू होती. पोलिसांनी गस्त करत प्रत्येकाला दुकान बंद करण्यास भाग पाडले. सुरुवातीला प्रेमाने समजावले, मात्र काही ठिकाणी दुकाने बंद करण्यास विरोध केला. पोलिसांनी त्यांना शासनाच्या नियमावलीबाबत माहिती देत दुकाने बंद करण्याची विनंती केली. अशात भाजी मार्केटमधील अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये काही प्रमाणात शुकशुकाट पहावयास मिळाला.
अशात, विक्रोळी, कन्नमवार नगर २ भागातील व्यापाऱ्यांना शनिवार, रविवारी पूर्णत: लॉकडाऊनच्या दिवशी दुकाने बंद राहणार असल्याचे वाटल्यामुळे दुकाने सुरू ठेवली होती. मात्र त्यांनाही पोलिसांनी नियमाबाबत समजावून दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अशाच प्रकारे, भांडुप, घाटकोपर परिसरातही हेच चित्र पहावयास मिळाले. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी विरोध केला. मात्र पोलिसांनी क़ायदेशीर कारवाईचा धाक दाखवून त्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. अशात, पोलीस ठिकठिकाणी गस्त करत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते.