Join us

वीकेंड लॉकडाऊनमुळे मुंबईत शटर डाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:05 AM

सलग दुसऱ्या दिवशी शुकशुकाट; तुरळक व्यवहारवगळता सर्वत्र कडकडीत बंदलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लागू केलेल्या ...

सलग दुसऱ्या दिवशी शुकशुकाट; तुरळक व्यवहारवगळता सर्वत्र कडकडीत बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लागू केलेल्या वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही संपूर्ण मुंबईत शुकशुकाट होता. शनिवारच्या तुलनेत रविवारी संपूर्ण मुंबई जास्तच सामसूम हाेती. सकाळचे तुरळक व्यवहार वगळले तर दुपारी, सायंकाळी धावत्या मुंबईचा वेग कमी झाला होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दक्षिण मुंबईतल्या महत्त्वाच्या बाजारपेठा बंद असल्याने आणि शहरासह उपनगरांतील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या तुरळक वाहतुकीमुळे वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही मुंबईचे शटर डाऊनच होते.

रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांत काही ठिकाणी बाजार सुरू होता तर, काही ठिकाणी दुकाने अर्धी उघडी होती. मस्जिद बंदर, भायखळा, लालबाग, कुर्ला, मालाड अशा महत्त्वाच्या ठिकाणांसह सर्वच रहिवासी क्षेत्रांत सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या लहान बाजारपेठांत भाजी घेण्यासाठी पुरुष घराबाहेर पडले होते. सगळ्याच दारूच्या दुकानांबाहेर तळिरामांनी गर्दी केली होती. मात्र, दुकाने खुली होत नसल्याने ही गर्दी पांगत गेली. बहुतांश बाजारपेठांतील रस्त्यांवर तुरळक भाज्या घेऊन काही महिला त्याची विक्री करत होत्या. याव्यतिरिक्त दूध, अंडी घेण्यासाठी काही ठिकाणी दुकानांचे अर्धे शटर उघडे होते. काही दुकानांच्या मागील दाराने व्यवहार सुरू होते. हे वातावरण दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईतील काही ठिकाणी होते.

दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शनिवारच्या तुलनेत रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. मनिष मार्केट, मस्जिद बंदरसह लगतच्या बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी व्यवहार शनिवारपासूनच बंद ठेवले. दक्षिण मुंबईतील सर्व व्यवहार, बाजारपेठा, दुकाने रविवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली.

डोंगरी येथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील रस्त्यांवर सकाळी तुरळक गर्दी होती. सकाळी १० वाजेपर्यंत येथील काही व्यवहार सुरू होते नंतर मात्र शुकशुकाट होता. लालबाग येथील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील रस्त्यांवर शुकशुकाट होता. रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद होती. एखादी बेस्ट बस दिसली तरी संपूर्ण रस्ते मोकळे होते.

बोरीवली, मालाडमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरांतही सकाळी १० वाजेपर्यंत काही व्यवहार सुरू होते. मात्र सकाळी ११ नंतर ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण पश्चिम उपनगरात शुकशुकाट होता. दुकाने, बाजारपेठा बंद होत्या.

* दुपारच्या सुमारास बहुतांश रस्ते निर्जन

मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, कुर्ला-अंधेरी रोडसह माहीम, वांद्रे, गिरगाव, फोर्ट येथील प्रमुख आणि वाहनांनी भरून वाहणारे रस्ते रविवारी निर्जन होते. दुपार जणू काही मध्यरात्र भासत होती. दुपारी बारा ते सायंकाळी ५ पर्यंत मुंबईत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर पुन्हा रस्त्यांवरील गर्दी वाढू लागली. रात्री ८ पर्यंत गर्दीत भर पडत असतानाच रात्री १० नंतर पुन्हा मुंबापुरीत शुकशुकाट झाला.

.........................