मुंबई - मागील काही वर्षांपासून बाहेरील खाद्यपदार्थांकडे सर्वांचा ओढा वाढला असताना शहर उपनगरातील सुमारे ९० टक्के हाॅटेल्स या अन्न सुरक्षा तपासणीत दोषी आढळले आहेत. यापैकी मागील वीस दिवसांत ६८ हाॅटेल्सना राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने सुधारणा नोटीस पाठविली आहे, तर अन्न व सुरक्षेचे नियम न पाळणारे तीन हाॅटेल बंद करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यात गोवंडी येथील क्लाऊड किचन स्वरूपातील हायपरकिचन, माहीम येथील मुंबई दरबार आणि वांद्रे येथील पापा पेंचो दा ढाबा यांचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणी प्रक्रियेत शहर उपनगरातील हाॅटेल्समध्ये स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसविलेले दिसून आले आहेत. याखेरीज, कचऱ्याकुंड्यावर झाकण न ठेवणे, अन्न सुरक्षा परवाना, अधिकृत नोंदणी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तक्रारींची नोंद न करणे, स्वयंपाक घरात सुरक्षेचे नियम न पाळणे, कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट न देणे या विविध तक्रारी समोर आल्या आहेत, असे अन्न सुरक्षा अधिकारी असणाऱ्या वर्षा खरात यांनी सांगितले.
हाॅटेल्सच्या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या १०० नियमांपैकी किमान ९० नियम पाळावे लागतात. मात्र, या तपासणीत अनेक हाॅटेल्समध्ये अस्वच्छतेची मुख्य तक्रार सर्रास दिसून आली आहे. दरम्यान, यापुढेही ही मोहीम अशीच सुरू राहणार असून दोषी आढळलेल्या हॉटेलवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
५५ हजारांचा दंड दोन हाॅटेल्सनामुंबईतील दोन हाॅटेल्सना नोटीस बजावूनही वेळेत सुधारणा न केल्याने दंड लावण्यात आला आहे. त्यातील एका हाॅटेलला ४० हजार आणि दुसऱ्या हाॅटेलला १५ हजार अशी दंड आकारणी करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वांद्रे येथील नामांकित हाॅटेलमध्ये खाद्यपदार्थांत उंदीर आढळल्यानंतर शहर उपनगरातील हाॅटेल्सची तपासणी रडारवर करण्यात येत आहे. यात ६८ हाॅटेल्सना सुधारणा नोटीस पाठविली आहे. त्यानंतर हाॅटेल व्यवस्थापकांना सुधारणा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येते. त्यानंतर पुन्हा एफडीएकडून तपासणी करण्यात येते. मात्र, दिलेल्या मुदतीतही हाॅटेल्सने पूर्तता अहवाल न पाठविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. यात कारवाईत दंड किंवा परवाना रद्द करण्यात येतो.- शैलेश आढाव, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन
हाॅटेल्समध्ये आढळल्या या त्रुटीअस्वच्छता, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य समस्यांची नोंद नसणे, पाण्याच्या जोडणीत अस्वच्छता, एफएसएसएआय क्रमांक दर्शनी भागात न लिहिणे, फ्रोजन फूडसंदर्भातील नियम न पाळणे, कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट न देणे, आचाऱ्यांनी ॲप्रन न घालणे इ.
‘एफएसएसएआय’ नंबर ग्राहकांसाठी महत्त्वाचाअन्न सुरक्षा विभागाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक उद्योजकाला अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘एफएसएसएआय’ नोंदणी आवश्यक आहे. खाद्यपदार्थ उद्योग मोठा असल्याने या व्यवसायांचा ‘एफएसएसएआय’ क्रमांक ग्राहकांना सहजासहजी दिसत नाही. जर संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडे एफएसएसएआय क्रमांक नसल्यास त्यांच्या विरोधात तक्रार करणे कठीण होते. ग्राहकांमध्ये याविषयी जनजागृती नसल्याचे दिसून येते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.