नियम मोडणाऱ्या दुकानांचे शटर होणार थेट बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:16 AM2020-06-06T01:16:58+5:302020-06-06T01:17:05+5:30
नियमित गस्त : पालिकेच्या विभागस्तरीय पथकाची दुकानदारांवर नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मिशन बिगिन अगेन टप्पा २ अंतर्गत मुंबईतील सर्व दुकाने सम-विषम पद्धतीने शुक्रवारपासून सुरू झाली. मात्र अद्यापही दररोज सरासरी १४०० कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने पालिका अधिकारी डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. दुकानांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागस्तरावर पथक तयार करण्यात येत आहे. हे पथक नियमित गस्त घालून सोशल डिस्टन्सचे नियम मोडणाºया दुकानांचे थेट शटर बंद करणार आहेत. तसेच सर्व दुकानदार नियम पाळतील याची जबाबदारी व्यापारी संघटनांवरही सोपविण्यात आली आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. आतापर्यंत ४४ हजार ७०४ रुग्ण सापडले आहेत. यापैकी १८ हजारांहून अधिक बरेही झाले आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी वाढत असल्याने अखेर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईतील लॉकडाऊनही टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येत आहे. मिशन बिगिन अगेन टप्पा १ अंतर्गत मुंबईकरांना उद्यानात फेरफटका, जॉगिंगची परवानगी देण्यात आली. तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियनची सेवा सुरू करण्यात आली आहे.
दुसºया टप्प्यात शुक्रवारपासून मुंबईतील सर्व दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू करण्यात येत आहेत. कोणत्या मार्गावरील दुकाने कधी खुली राहणार याचे नियोजन स्थानिक व्यापारी संघटनांबरोबर चर्चा करून निश्चित करण्यात येत आहे.
त्यानुसार मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांनी शुक्रवारी परिपत्रक काढून आपल्या विभागातील दुकानदारांना सूचित केले.
कोणते नियम पाळावे, ग्राहकांना वस्तू देताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सर्व सूचना करण्यात आल्या आहेत.
विभागीय देखरेखीखाली सर्व दुकाने व मंडयांमध्ये व्यवहार सुरू होणार आहेत.
विभागीय पथकाची नियमित गस्त
पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने परिपत्रक पाठवून सर्व विभागांना आपल्या परिसरातील दुकानांचे नियोजन व त्यांच्यावर गस्त ठेवण्याची सूचना केली होती. त्यानुसार, रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेली दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेली दुकाने मंगळवार, बुधवार आणि शनिवार अशा पद्धतीने स. ९ ते सायं. ५ या वेळेत सुरू ठेवण्याचे नियोजन विभाग स्तरावर सुरू आहे. मात्र या दुकानांमध्ये दुकानदार सोशल डिस्टन्स पाळले जात आहे याची खबरदारी घेत आहेत का, याची पाहणी विभागातील विशेष पथक करणार आहे.
उद्याने, सार्वजनिक ठिकाणी अशी आहेत बंधने
मुंबईकरांना सकाळी सार्वजनिक ठिकाणी फेरफटका मारण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच उद्यानातील खुली व्यायामशाळा, झोपाळे व अन्य साधनांना हात लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबईतील मुख्य बाजारपेठ असलेल्या दादरमध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळता सोमवार, बुधवार, शुक्र वार या दिवशी पूर्व व दक्षिणेकडील दुकाने तसेच मंगळवार, गुरु वार व शनिवारी पश्चिम व उत्तर दिशेकडील दुकानांचे व्यवसाय सुरू राहणार आहेत. मात्र सर्व दुकाने सुरू करण्याआधी स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच दुकान मालकांनी कर्मचाऱ्यांच्या व स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क, सॅनिटायझर वापरावे अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, मॉल्स आणि उपाहारगृहे सध्या बंद ठेवण्यात येतील.
- किरण दिघावकर,
जी उत्तर विभाग, सहायक आयुक्त