Join us

महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराने भारताला मिळवून दिले कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 2:03 AM

जागतिक कौशल्य स्पर्धा; ग्राफिक डिझायनिंगमध्ये मिळाले यश, भारत १३ व्या स्थानावर

मुंबई : दर दोन वर्षांनी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत भारताने २६ गुणांसह १९ पदकांची कमाई करत १३ वे स्थान पटकावले. यामध्ये १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश असून १५ उत्कृष्टतेसाठीची बक्षिसे सुद्धा आहेत. विशेष म्हणजे पदक तालिकेतील कांस्य पदकाची कमाई महाराष्ट्रातील आयटीआयच्या श्वेता रतनपुराच्या नावे आहे. ग्राफिक डिझायनिंगमध्ये तिने हे यश भारताला मिळवून दिले आहे.

४५ वी जागतिक कौशल्य स्पर्धा २२ ते २७ आॅगस्टदरम्यान रशियातील कझान येथे झाली. स्पर्धेत ६० देशांच्या विविध ५६ कौशल्य स्पर्धांमध्ये तब्ब्ल १६०० तरुण सहभागी झाले होते. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या (एमएसडीई) अखत्यारीतील राष्ट्रीय कौशल्य महामंडळ (एनएसडीसी) २०११ पासून या द्विवार्षिक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. यंदा ४४ कौशल्य स्पर्धांमध्ये ४८ स्पर्धकांनी भारताचे नेतृत्त्व केले. यामधील वॉटर टेक्नॉलॉजी स्पर्धेत भारताला सुवर्ण, वेब टेक्नॉलॉजी स्पर्धेत रौप्य तर ग्राफिक डिझायनिंग व ज्वेलरी स्पर्धेत कांस्य पदक मिळाले. भारतात झालेल्या वर्ल्ड स्किल इंडिया स्पर्धेत २३ पदकांची कमाई करत भरताने पहिले स्थान पटकाविले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील ७ विद्यार्थ्यांचा भारताच्या ४८ स्पर्धकांमध्ये सहभाग होता.आयटीआयसाठी अभिमानास्पदमहाराष्ट्रातील आयटीआयसाठी ही अभिमानाची बाब असून हे यश इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे आहे. आयटीआयच्या भविष्यातील प्रगतीसाठी आम्ही अनेक कंपन्यांशी सामंजस्य करार करून अद्ययावत राहण्याचा प्रयत्न करत आहोत.- दीपेंद्र सिंह कुशवाह, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय 

टॅग्स :मुंबई