लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणाच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार श्यामवर राय याची उलटतपासणी तब्बल पाच महिन्यांनी संपली. इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांनी रायची उलटतपासणी संपवत असल्याचे शुक्रवारी विशेष न्यायालयाला सांगितले.इंद्राणीचे वकील सुदीप पासबोला यांनी आॅगस्टमध्ये श्यामवर रायची उलटतपासणी घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी ती संपल्याचे पासबोला यांनी सांगितले. राय याने पोलिसांशी हातमिळवणी करून इंद्राणीला नाहक केसमध्ये अडकवल्याचे पासबोलांचे म्हणणे आहे. त्याला पोलिसांनी अटक केले, त्या तारखेच्या १५ दिवसांपूर्वीपासूनच तो बेरोजगार असल्याचे पासबोला यांना रायने उलटतपासणीदरम्यान सांगितले. मात्र पोलीस त्याला अटक केल्याची जी तारीख दाखवत आहेत, त्याच्या १५ दिवसांपूर्वीपासूनच तो पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पासबोला यांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात इंद्राणीच्या वकिलांनी श्यामवर रायचे कॉल डाटा रेकॉर्ड न्यायालयात दाखल केला. त्यानुसार, शीनाची हत्या होण्याच्या आठवडाभरापूर्वी रायने समीर बुद्धाला २१ वेळा कॉल केला. समीर बुद्धा हे माजी पोलीस अधिकारी सोहील बुद्धा यांचे भाऊ आहेत.पासबोला यांनी दोन्ही मोबाइल नंबर रायला दाखवले. रायने हे नंबर कोणाचे आहेत, ते आठवत नसल्याचे सांगितले. हे दोन्ही मोबाइल ज्यांचे आहेत, त्यांच्या मालकांना घेऊन रायने पोलिसांशी हातमिळणी केल्याचे पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले.
श्यामवर रायची उलटतपासणी संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 5:08 AM