मुंबई : एक कर्मचारी ५ ते ६ दिवसांपासून आजारी होता. त्याची स्वॅब चाचणी करण्यात आली होती, पण त्याचा अहवाल येणे बाकी होता. तरीही त्याला अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले होते. मात्र मुंबईला गेल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एसटी प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.
एसटीच्या सूत्रांनी सांगितले की, सांगली विभाग नियंत्रक आणि कवठेमहांकाळ आगार व्यवस्थापक यांनी अत्यावश्यक सेवा देण्यासाठी एका कर्मचाऱ्याला मुंबई येथे पाठविले होते. संबंधित कर्मचारी यांनी आगार व्यवस्थापक कवठेमहांकाळ यांना विनंती करून मी स्वॅब दिला असून माझा अहवाल येणे बाकी आहे. मला त्रास होत असून मला मुंबई येथे कामगिरीसाठी पाठवू नये अशी विनंती केली होती.
कवठेमहांकाळ आगार व्यवस्थापक यांनी विभाग नियंत्रक सांगली यांचा आदेश असून कोणतेही कारण न सांगता तुम्ही मुंबईला जा, असा आदेश दिला. त्यामुळे सदर कर्मचारी मुंबईला गेला आणि आज संबंधित कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कर्मचाऱ्याच्या विनंतीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी कवठेमहांकाळ ते मुंबई एसटी बस घेऊन कर्मचारी व प्रवाशांसह गेला. तर मुंबई येथे इतर सहकर्मचारी यांच्यासह वावरला. त्यामुळे कोरोनाचा प्रसार एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे होत आहे. कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेले कर्मचारी यांची कोरोना टेस्ट त्वरित करावी अन्यथा कोरोनाचा प्रसार वाढू शकतो याबाबत तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.
सांगली येथील कर्मचारी मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी आला होता. पण त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पुन्हा सांगलीला पाठविण्यात आले आहे. - वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ