सिद्धगडी झुंबड
By admin | Published: July 2, 2015 11:16 PM2015-07-02T23:16:01+5:302015-07-02T23:16:01+5:30
सह्याद्रीच्या कुशीत असलेले सिद्धगड हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देतात. या पर्वतरांगेत पाच- सहा धबधबे पर्यटकांचे मन मोहीत करतात.
सुधाकर वाघ, धसई
सह्याद्रीच्या कुशीत असलेले सिद्धगड हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देतात. या पर्वतरांगेत पाच- सहा धबधबे पर्यटकांचे मन मोहीत करतात. या गडाच्या खालच्या बाजूला भव्य धबधबे आहेत. धबधब्यांत मनसोक्त डुंबण्याचा व रानात फिरण्याचा आनंद घेता येतो. त्यापैकी सिद्धगडच्या खालील बाजूला बोरवाडीजवळील हुतात्मा स्मारकाजवळील ५०० फूट उंचीचा फेसाळणारा मोठा धबधबा अधिकच आकर्षक आहे.
सिद्धगडच्या या धबधब्यांकडे मुरबाड- म्हसामार्गे जांभुर्डे गावावरून जाता येते. जांभुर्डे गावाजवळून हे धबधबे ९ किमी अंतरावर आहेत. याच हुतात्मा स्मारकाजवळ भव्य धबधबा आहे. या ठिकाणी अनेक तरु ण-तरु णी पावसाळ्यात मौजमजा करण्यासाठी येतात. बोरवाडी गावाजवळ भीमाशंकर अभयारण्यात हे धबधबे आहेत. त्यामुळे या ठिकाणी हॉटेलची व्यवस्था नाही. त्यामुळे या ठिकाणी जातांना जेवणाचा डबा घेऊन जावे लागते. हे धबधबे पर्वतरांगेत असल्याने सावधगिरी बाळगूनच जावे लागते. या ठिकाणी अभयारण्य असल्यामुळे दक्षता घ्यावी. तसेच हे धबधबे हुतात्मा स्मारकानजीक असल्याने तिथे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. डोंगराळ भाग असल्याने जोरदार पाऊस पडल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे येत असल्याने हा परिसर प्रदूषित होतो. हा कचरा, प्लॅस्टिक स्थानिक परिसरातील आदिवासी स्वच्छ करून स्मारकाचे पावित्र्य राखतात. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यांचा मनसोक्त आनंद लुटावा, परंतु शिस्त आणि पावित्र्य मनापासून राखावे, अशी स्थानिकांची अपेक्षा असते.