Join us

सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात सिद्धार्थ पिठानीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:06 AM

एनसीबीची कारवाई; हैदराबादमधून घेतले ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात ...

एनसीबीची कारवाई; हैदराबादमधून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने हैदराबादमधून अटक केली. ट्रान्झिट रिमांडवर त्याला मुंबईत आणण्यात आले असून, न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. त्याने सुशांतला ड्रग्ज पुरविल्याची माहिती समोर आली असून, एनसीबीचे पथक अधिक तपास करीत आहे.

सुशांतने १४ जून २०२० रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सिद्धार्थ हा सुशांतचा मित्र, तसेच त्याचा मॅनेजर म्हणून काम पाहत होता. तो सुशांतसोबतच राहायचा. या प्रकरणात गेल्या वर्षी ८ जून ते १४ जूनदरम्यान काय घडले, याच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस, सीबीआय आणि ईडीकडूनही त्याची वेळोवेळी चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनेही सिद्धार्थला वारंवार चौकशीसाठी हजर राहावे म्हणून समन्स बजावले हाेते. मात्र, त्याने एनसीबीच्या नोटीसला प्रतिसाद दिला नाही. अखेर तो हैदराबादमध्ये असल्याचे समजताच एनसीबीच्या पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले. त्याचा जबाब नोंदवून, चौकशीअंती ड्रग्ज प्रकरणात त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

................................