Join us

सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीला तडे, मेट्रो- ३ कामाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:25 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३च्या कामाने आता वेग घेतला आहे. सिद्धार्थ महाविद्यालयासमोरील रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे महाविद्यालयाच्या इमारतीला तडे जात आहेत

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३च्या कामाने आता वेग घेतला आहे. सिद्धार्थ महाविद्यालयासमोरील रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे महाविद्यालयाच्या इमारतीला तडे जात आहेत, तसेच मेट्रोच्या कामामुळे होणाºया कर्कश आवाजामुळे २ ते ३ फुटांवरचेही स्पष्ट ऐकायला येत नसल्याने, अध्ययनात अडथळे येत आहेत. जीवितहानीचा धोका आणि कर्कश आवाजामुळे त्रस्त झालेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाने, एमएमआरडीए, एमएमआरसीए आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. यात काम बंद करा अथवा पर्यायी मार्ग शोधा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.मेट्रो ३च्या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या कामासाठी नवीन मशिन वापरण्यात येत आहेत. या मशिनमुळे सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीला धक्के बसत आहेत. दिवसभर काम सुरू असल्याने सिद्धार्थ महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांसह, प्राध्यापक व अन्य कर्मचाºयांना याचा दररोज त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या त्रासातून मार्ग काढण्यासाठी सिद्धार्थ महाविद्यालयाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. २९ सप्टेंबरला त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून, यामध्ये मेट्रोच्या कामामुळे होणारा त्रास आणि जीवितहानीच्या धोक्याविषयी अधोरेखित केले आहे.सिद्धार्थ महाविद्यालयात एकूण ४ हजार ५०० विद्यार्थी शिकत आहेत, तर विधि महाविद्यालयात १ हजार ५०० विद्यार्थी आहेत, तसेच एकूण १४० कर्मचारी या महाविद्यालयात कार्यरत आहेत. सिद्धार्थ महाविद्यालयाची इमारत ही १२५ वर्षे जुनी आहे. मेट्रो ३चे काम आता नवीन मशिनने सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता महाविद्यालयाच्या इमारतीच्या भिंती हलतात. बेसमेंट आणि काही ठिकाणी इमारतींना तडे गेले आहेत, तसेच मोठ्याने होणाºया आवाजामुळे विद्यार्थ्यांना प्राध्यापक काय सांगतात, हे ऐकायला येत नाही. या आधी २८ आॅगस्टला एमएमआरसीएला आॅनलाइन तक्रार नोंदविली होती, पण तरीही अजूनही काम सुरूच आहे. इमारत जुनी असल्यामुळे हादºयांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी मेट्रोचे काम रात्री करावे, अथवा बंद करून अन्य पर्याय शोधावा, अशी मागणी असल्याचे सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य उमाजी म्हस्के यांनी स्पष्ट केले.