नवी मुंबई : सिद्धार्थ शर्मा (३२) या तरुणाला दिल्लीत रस्ता ओलांडताना सोमवारी एका भरधाव मर्सिडीज गाडीने उडविल्याने त्याचा मृत्यू झाला. सिद्धार्थ हा नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी होता. या दुर्घटनेच्या वृत्ताने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ऐरोली सेक्टर-४ येथील डी-६0 या रोहाऊसमध्ये मागील २०-२५ वर्षांपासून शर्मा कुटुंबीय राहावयास आहे. सिद्धार्थचे वडील एच.आर. शर्मा यांचा हैदराबाद येथे व्यवसाय आहे. त्यामुळे अधिक काळ ते तिकडेच राहतात, तर सिद्धार्थची बहीण शिल्पा ही दिल्ली येथे आपल्या कुटुंबीयांबरोबर राहते. सिद्धार्थ याचा एक वर्षापूर्वीच विवाह झाला होता. परंतु काही महिन्यांतच त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यामुळे त्याच्या बहिणीने पाच महिन्यांपूर्वी त्याला दिल्ली येथे बोलावून घेतले होते. तेव्हापासून तो तेथेच राहत होता. दिल्लीत तो आयटी क्षेत्रात कार्यरत होता. सोमवारी रात्री येथील सिव्हिल लाइन्स भागात रस्ता ओलांडताना एका भरधाव मर्सिडीज गाडीने त्याला उडविले. यात तो गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच त्याची आई मधू शर्मा या तातडीने दिल्लीला रवाना झाल्या. सध्या त्यांच्या ऐरोलीतील घराला टाळे आहे. मात्र या दुर्घटनेमुळे सेक्टर-४ मधील डी टाईप वसाहतीतील रहिवाशांना चांगलाच धक्का बसला आहे. सिद्धार्थ हा अत्यंत मितभाषी स्वभावाचा होता. प्रत्येकाशी आदराने वागायचा. त्याच्या आकस्मिक मृत्यूच्या वृत्ताने आपणाला धक्का बसल्याची प्रतिक्रिया सिद्धार्थच्या समोरील रोहाऊसमध्ये राहणाऱ्या दुबे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या त्या मर्सिडिज चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सिद्धार्थच्या मृत्यूने ऐरोलीत हळहळ
By admin | Published: April 08, 2016 2:04 AM