Join us

सिद्धार्थनगरचा स्कायवॉक रखडला

By admin | Published: December 03, 2014 11:19 PM

कल्याण (पूर्व), सिद्धार्थनगर भागातील स्कायवॉकचे काम ठेकेदाराच्या मक्तेदारीमुळे रखडले असल्याची माहिती हाती आली आहे.

कोळसेवाडी : कल्याण (पूर्व), सिद्धार्थनगर भागातील स्कायवॉकचे काम ठेकेदाराच्या मक्तेदारीमुळे रखडले असल्याची माहिती हाती आली आहे.येथील रेल्वे रुळांवरून सातत्याने मालगाड्यांची वाहतूक सुरू असते. या गाड्या बहुतांश वेळी या भागातच थांबलेल्या असतात. कोळसेवाडी, जिमी बाग, आमराई, तिसगाव व चक्कीनाका परिसरांत वाढत्या लोकसंख्येमुळे प्रचंड रहदारी वाढली आहे. नेमक्या गर्दीच्या वेळी या गाड्या बऱ्याच वेळ उभ्या राहत असल्यामुळे महिला प्रवाशांची कोंडी होते. पुरुष प्रवासी धोका पत्करून मालगाड्या पार करतात. पण, काही वेळा अपघात घडले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून लोकांच्या मागणीनुसार रेल्वे स्थानक ते सिद्धार्थनगर-कोळसेवाडी स्कायवॉकला मंजुरी मिळाली. रेल्वे आणि मनपाच्या संयुक्त सहकार्याने या स्कायवॉकच्या कामाचे भूमिपूजन २१ आॅगस्ट २००९ मध्ये झाले. तेव्हापासून ते विविध कारणास्तव धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे येथील प्रवाशांचा मालगाडीचा अडथळा दूर होण्यास अजून किती वर्षे लागतील, असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारत आहेत.स्कायवॉकचे काम सुरू झाल्यापासून रेल्वेने विविध खात्यांच्या परवानगीसाठी तर कधी आराखड्यासह निधी मंजुरीसाठी आणि सध्या एलिव्हेटेड रेल्वे बुकिंग आॅफिसच्या कामाच्या निविदांचा निर्णय होत नसल्यामुळे स्कायवॉकचे काम रखडले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दुसऱ्यांदा एकाच ठेकेदाराची ३६ टककयांवरील निविदा आली आणि संबंधित ठेकेदार, अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या साटेलोट्यामुळे दर कमी करायला तयार नाहीत. तिसऱ्यांदा निविदा पुकारून झाल्या असून कोणाकडूनही प्रतिसाद न आल्यामुळे प्रशासन कैचीत सापडले आहे. आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी विचारणा केली असता त्यांनी लवकरात लवकर स्कायवॉकच्या कामास सुरुवात होईल, असे सांगितले. उपअभियंता घनश्याम नरांगुळ म्हणाले, निविदा एकूण १०.८५ कोटींची असून एलिव्हेटेड बुकिंग आॅफिससाठी अंदाजे रु. २ कोटी लागणार आहेत.