सिद्धि विनायक : हार, फुले, प्रसाद विक्रेत्यांवर अवलंबून १ हजार ५०० कुटूंबावर कोसळला आर्थिक संकटांचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:32 PM2020-07-19T13:32:29+5:302020-07-19T13:32:51+5:30
सिद्धिविनायक मंदिर गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद आहे.
मुंबई : कोरोनाविरोधात लढण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद आहे. याचा फटका येथील हार विक्रेते, फुले विक्रेते, प्रसाद विक्रेते यांना बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे सिद्धिविनायकाच्या चरणी सेवा करत हा व्यवसाय करत असलेल्या १०० दुकानांच्या खरेदी विक्रीवर सुमारे १ हजार ५०० कुटूंबाचा चरितार्थ चालत आहे. आणि आता सर्वच काही बंद असल्याने ही १ हजार ५०० कुटूंब आर्थिक विंवचनेत अडकली आहेत. परिणामी यांना दिलासा देण्यासाठी सरकारने महत्त्वपुर्ण पाऊले उचलावीत, असे म्हणणे येथून मांडले जात आहे.
सिद्धिविनायक मंदिर परिसरात हारे, फुले, मिठाई अशी विक्रीची अनेक दुकाने आहेत. एकूण येथे १०० दुकाने आहेत. प्रवेशद्वारा आत ६० दुकाने आहेत. येथे दिवसाला एका दुकानाचे उत्त्पन्न पाच ते दहा हजार एवढे आहे. काही वेळेला हे उत्त्पन्न पंधरा हजार देखील आहे. ही सर्व दुकाने गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अशी आपत्ती आली नव्हती. कोरोनामुळे मोठी आपत्ती आली आहे. येथे मोर्चा आला तरी येथील दुकाने कधी बंद झाली नाहीत. मात्र आता दुकाने बंद असल्याने मालक आणि कामगार घरी आहेत. शंभर एक दुकाने म्हटली तरी १ हजार ५०० कुटूंब आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहेत. दुकानांव्यतीरिक्त फुले विकणा-या महिला आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहेत. गजरेवाले आहेत. त्यांचे उत्त्पन्न बुडाले आहेत. हारेवाले आहेत. हार बांधणारे कामगार आहेत. पेढे वाले आहेत. त्यांच्याकडे कामगार आहेत. अशा प्रत्येकाला मोठा फटका बसला आहे.
.........................
एका दुकानाला आले ४ हजार रुपये वीज बिल
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या चारएक महिन्यांपासून ही दुकाने बंद असून, बेस्टने जी विजेची बिले पाठविले आहेत. यामध्ये एका महिन्याचे बील तीन हजार रुपये या प्रमाणे ४ महिन्यांचे म्हटले तरी १२ हजार रुपये वीज बिल आले आहे. आता चार महिने दुकान बंद असेल तर एवढे मोठे वीज बिल भरायचे कसे? असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. बेस्टकडे याबाबत तक्रार केली तर पहिल्यांदा बील भरा नंतर काय ते बघू, असे बेस्ट म्हणत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
.........................
आर्थिक मदत करा
येथील दुकानदारांना मोठया संख्येने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. परिणामी आर्थिक तोटयात अडकलेल्या दुकानदारांना सरकारने मदत करावी, अशी मागणी देखील दुकानदारांकडून केली जात आहे.
.........................