माघी गणेशोत्सवानिमित्त दर्शन व्यवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माघी गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचे नियम पाळूनच प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात सोमवारपासून सुरू होणारा माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अॅपवर नोंदणी करून सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार आहे.
टिटवाळ्याच्या प्रसिद्ध महागणपतीचे माघी गणेशोत्सवानिमित्त ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे. मंदिराच्या सभा मंडपात भाविकांना प्रवेश मिळणार नाही. मंदिर व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या विशिष्ट अंतरावरून भक्तांना बाप्पांचे दर्शन घेता येणार आहे. याशिवाय माघी गणेशोत्सवानिमित्त कीर्तनाचा आनंद भक्तांना घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाविषयक अन्य नियमांचे पालन करावे लागणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. घरगुती स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जात असून, रविवारी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणेशाची मूर्ती घरी आणली असून, सोमवारी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.