Join us

सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे जीवरक्षकांना विमाकवच - आदेश बांदेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2017 11:53 PM

सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे गणेश विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. या जीवरक्षकांचा मंदिर न्यासातर्फे प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.

मुंबई, दि. 3 - सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे गणेश विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. या जीवरक्षकांचा मंदिर न्यासातर्फे प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. गणेश विसर्जनासाठी मुंबईतल्या कोळीवाड्यातील कोळी बांधव व जीवरक्षक समुद्रात खोल पाण्यात किंवा मुंबईतल्या तळ्यांमध्ये जातात. त्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी विमा उतरवण्यात आल्याचे मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले आहे.

अतिशय अल्प मानधन मिळत असले, तरी मिरवणूक संपेपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक जीव ओतून शहरातील गणेशभक्‍तांना विसर्जनासाठी मदतीचा हात देतात. श्रींचे विसर्जन करताना वाहत्या पाण्यापासून भक्तांना दूर ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. जीवरक्षकांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. जेमतेम पगार असतानाही जीवरक्षक आपल्या जिवाची बाजी लावून वाहत्या पाण्यात बुढणाऱ्या भक्तांना वाचवतात. अशा वेळी त्यांच्या जिवाचा वाली कोण? स्वत:च्या कुटुंबियांचा विचार न करता ते पाण्यात उतरुन भक्तांना वाचवण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या जिवाचे सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे जीवरक्षकांना विमाकवच उतवरण्यात आला आहे.

शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची 26 जुलै 2017 रोजी श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली होती. नेमणूक झाल्यानंतर न्यासाचे अध्यक्ष म्हणून भाविकांची सेवा हाच भाव या सूत्रानं काम करणार असल्याचं बांदेकर यांनी सांगितले होते.गणेशोत्सवातील शेवटचे दोन दिवस बाकी राहिले आहेत. आज रविवार गाठून हजारो मुंबईकर गणपतीच्या दर्शनासाठी बाहेर पडले. उपनगरांमधून गर्दीचे लोट दिवसभर मुंबईकडे वाहत होते. रेल्वे, बस, टॅक्सी अशा मिळेल त्या वाहनाने गणेश भक्तांच्या झुंडी येत होत्या. लहान मुले, तरुण महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात गणेश दर्शनासाठी येतायत. त्यामुळे दादर-लालबाग-परळमध्ये गणेश भक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. करी रोड, चिंचपोकळी रेल्वे स्थानकातून गणेश भक्तांचे जथेच्या जथे लालबागच्या दिशेने निघाले होते. गिरणगावात उसळलेली गर्दी लक्षात घेऊन भारतमाता चित्रपटगृहापासून डॉ. आंबेडकर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

 

टॅग्स :गणेशोत्सव