मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून 23 जणांचा मृत्यू झाला होता. तिवरे भेदवाडी गावातील नदी किनारी असलेली ४५ घरे पूर्णतः वा अंशतः नष्ट झाली होती. घराबरोबर जनावरांचे गोठेही वाहून गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधनही प्राणास मुकले. धरणफुटीमुळे केवळ पिकेच वाहून गेली नाहीत, तर शेतजमीनही वाहून गेली आहे. त्यामुळे तिवरे गावाच्या पुर्नवसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र तिवरे गावाचं पुर्नवसन करण्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक न्यास समिती पुढे सरसावली आहे.
तिवरे गावाचं पुर्नवसन करण्याचा निर्णय सिद्धिविनायक न्यास मंदिर समितीने घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार न्याय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना सिद्धिविनायक न्यास समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले की, शिवसेना आमदार उदय सामंत यांनी सिद्धिविनायक मंदिराला पत्र लिहून तिवरे धरणातील पीडितांच्या पुर्नवसनासाठी मदत करावी अशी मागणी केली होती. तसेच खासदार विनायक राऊत यांनी मंदिर समितीकडे मदत मागितली होती. त्यावर सकारात्मक विचार करुन सिद्धिविनायक न्यास समितीकडून बैठकीत भरीव तरतूद करण्याला मान्यता मिळाली. याबाबतचा पुढील प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती आदेश बांदेकर यांनी दिली आहे.
2 जुलै रोजी रत्नागिरीतील तिवरे धरण फुटलेय यामुळे तिवरे गावातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. यामध्ये रस्ते, पूल, विद्युतव्यवस्था व इतर मूलभूत सुविधांचा समावेश आहे. तिवरे, फणसवाडी, कुंभारवाडी, भेंदवाडी गावातील नळपाणी पुरवठा योजना धरणफुटीमुळे बाधित झाल्या आहेत. त्यामुळे सदर गावातील पाणीपुरवठा बंद झाला असून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तिवरे धरणग्रस्त पीडितांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पवारांनी मृत कुटुंबियांच्या वारसांना शासनाने चार लक्ष रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले असले तरी सदर अनुदान हे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्थायी आदेशाद्वारे दिले जाणारे अनुदान आहे. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून अनुदान वितरित व्हावे. वाहून गेलेल्या जमिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जावा. पीक नुकसानाचे राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण केले जावेत. मृत कुटुंबांच्या मुलांची शिक्षणाची व राहण्याची सोय करावी. कमावत्या मृत व्यक्तींच्या वारसांना तसेच उपजीविकेचे साधन नष्ट झाल्यामुळे जीवित व्यक्तींना देखील शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेतले जावे अशा अनेक मागण्या केल्या होत्या.
पाहा व्हिडीओ -