मुंबई : राज्यातील आदिवासी भागातील बालमृत्यूंचे प्रमुख कारण न्यूमोनिया हा आजार आहे. हा आजार आदिवासी भागात अधिक आढळून येत आहे. बालकांना योग्य वेळी न्यूमोकोकल लसीकरण केल्याने बालकांंमध्ये न्यूमोनिया आजारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण घटण्यास मदत होईल. परिणामी लहान मुलांना न्यूमोकोकल लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभागाच्या मान्यतेने १० कोटी रुपये एवढा निधी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
राज्यातील १६ आदिवासी बहुल जिल्ह्यांत १४ टक्के लोकसंख्या आहे. नंदुरबार, पालघर, गडचिरोली, अमरावती व नाशिक या पाच जिल्ह्यात १ वर्ष वयोगटातील अंदाजे १.४१ लक्ष बालकांना पहिल्या टप्प्यात या लसीचे लसीकरण करता येईल. न्यूमोकोकल ही लस बालकाला नऊ महिने पूर्ण होईपर्यंत ३ टप्प्यात द्यावी लागते. अशा प्रकारे ५ जिल्ह्यांसाठी ४.६२ लाख डोसची आवश्यकता आहे. न्यूमोकोकल ही लस ४ डोसच्या व्हायलमध्ये असून, प्रति व्हायलची किंमत अंदाजे आठशे रुपये आहे. या पाचही जिल्ह्यांत लसीकरण करण्यासाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.