Join us

सिद्धिविनायक मंदिर बंद असल्यामुळे फुले, प्रसाद विक्रेत्यांवर आर्थिक संकटांचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 2:25 AM

चरितार्थ चालवण्याचा भेडसावतोय प्रश्न

मुंबई : कोरोनाविरोधात लढण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद आहे. याचा फटका येथील हार विक्रेते, फुले विक्रेते, प्रसाद विक्रेते यांना बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे सिद्धिविनायकाच्या चरणी सेवा करत हा व्यवसाय करत असलेल्या १०० दुकानांच्या खरेदी-विक्रीवर सुमारे १ हजार ५०० कुटुंबांचा चरितार्थ चालत आहे. आणि आता सर्व काही बंद असल्याने ही १ हजार ५०० कुटुंबे आर्थिक विवंचनेत अडकली आहेत. परिणामी यांना दिलासा देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलावीत, असे म्हणणे येथून मांडले जात आहे.

सिद्धिविनायक मंदिर परिसरात हार, फुले, मिठाई अशी विक्रीची अनेक दुकाने आहेत. एकूण येथे १०० दुकाने आहेत. प्रवेशद्वाराच्या आत ६० दुकाने आहेत. येथे दिवसाला एका दुकानाचे उत्पन्न पाच ते दहा हजार रुपये एवढे आहे. काही वेळेला हे उत्पन्न पंधरा हजारांपर्यंतही आहे. ही सर्व दुकाने गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अशी आपत्ती आली नव्हती. कोरोनामुळे मोठी आपत्ती आली आहे. येथे मोर्चा आला तरी येथील दुकाने कधी बंद झाली नाहीत. मात्र आता दुकाने बंद असल्याने मालक आणि कामगार घरी आहेत.

शंभरएक दुकाने म्हटली तरी १ हजार ५०० कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. दुकानांव्यतिरिक्त फुले विकणाऱ्या महिला आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. गजरेवाले आहेत. त्यांचे उत्त्पन्न बुडाले आहेत. हारवाले आहेत. हार बांधणारे कामगार आहेत. पेढेवाले आहेत. त्यांच्याकडे कामगार आहेत. अशा प्रत्येकाला मोठा फटका बसला आहे.

एका दुकानाला आले ४ हजार रुपये वीजबिल

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या चारएक महिन्यांपासून ही दुकाने बंद असून, बेस्टने जी विजेची बिले पाठविली आहेत. यामध्ये एका महिन्याचे बील तीन हजार रुपये याप्रमाणे ४ महिन्यांचे म्हटले तरी १२ हजार रुपये वीजबिल आले आहे. आता चार महिने दुकान बंद असेल तर एवढे मोठे वीजबिल भरायचे कसे? असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. बेस्टकडे याबाबत तक्रार केली तर पहिल्यांदा बिल भरा नंतर काय ते बघू, असे बेस्ट म्हणत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

आर्थिक मदत करा!

येथील दुकानदारांना मोठ्या संख्येने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी आर्थिक तोट्यात अडकलेल्या दुकानदारांना सरकारने मदत करावी, अशी मागणीही दुकानदारांकडून केली जात आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई