उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा होणार विकास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:51 AM2024-03-14T10:51:56+5:302024-03-14T10:55:59+5:30
उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास होणार आहे.
मुंबई : उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास होणार आहे. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याकरिता मुंबई पालिकेने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत मंदिर परिसराचे सुशोभिकरण, पुनर्नियोजनही करण्यात येणार आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, पूजा-साहित्य विक्रेत्यांची व्यवस्था आदींचा यात समावेश आहे. याचा विस्तृत अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागरीकिनारा मार्गाच्या एका मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात या प्रकल्पाची घोषणा केली. यावेळी खा. राहुल शेवाळे, आ. सदा सरवणकर यांनी शिंदे यांना सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभिकरणाच्या कामाला गती द्यावी, या मागणीचे पत्र दिले. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक आहे.
यामुळे घेतला निर्णय - या मंदिरात जगभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र, अत्यंत गजबजलेल्या या परिसरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे.
प्रकल्पातील महत्त्वाच्या सुविधा -
१) भाविकांसाठी स्वतंत्र येण्या-जाण्यासाठी रस्ता
२) मंदिराच्या दोन्ही मार्गांवर प्रवेशद्वार
३) भाविकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह
४) रांगेत असलेल्या भाविकांना छतासह तात्पुरती आसन व्यवस्था
५) मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण
६)भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था