मुंबई - भारतीय लष्करात नायब सुभेरदार सुनील रावसाहेब वलटे (वय ३८, रा. दहेगाव बोलका, ता. कोपरगाव) हे जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. वलटे कुटुंबियांवर आता सिद्धीविनायक मंदिर न्यासाने वडिलकीचे छत्र धरल आहे. शहिद वलटे यांच्या दोन्ही मुलांचा पुढील शिक्षणाचा सर्व खर्च सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास करणार असल्याची माहीती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
जम्मू-काश्मीर मधील नौशेरा सेक्टर या भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना सुनील वलटे यांना वीरमरण आले. सुनील वलटे यांचे वडील रावसाहेब हे कोपरगावात शेतकरी आहेत. आई सुशीला आणि पत्नी मंगल या गृहिणी आहेत. सुनील वटले यांचा मुलगा १४ वर्षांचा आणि मुलगी ६ वर्षांची आहे. शहिद सुनील वलटे यांना आलेल्या वीरमरणाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शहिद कुटुंबातील मुलांचा केजी ते पीजी असा शिक्षणाचा सर्व खर्च सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासास करण्याची परवानगी राज्य सरकारने याआधीच अध्यादेशाद्वारे दिली आहे.