मुंबई : कोट्यवधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरात प्रसादासाठी विक्री केल्या जाणाऱ्या मोदक, पेढा प्रसादातून यापुढे साखरेचे मोदक विक्री न करण्याचा निर्णय येथील पूजा साहित्य विक्रेता सेना संघटनेने घेतला आहे. तसेच मोदक, पेढ्याचे दरही निश्चित करण्यात आले आहे. भाविकांना आता माव्याचा प्रसाद मिळणार आहे.
साखरेचे मोदक विकल्यास दुकानाचा परवानाही रद्द केला जाणार आहे. सिद्धिविनायकाच्या भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी दुकानदारांनी एकमताने निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरातील अधिकृत खासगी दुकानात मोदक, पेढा प्रसादाची मोठी उलाढाल सुरू असते. मात्र, भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत, येथे माव्याऐवजी सारखेचे मोदक किंवा पेढा भाविकांना जास्तीच्या दराने विकले जात होते. त्यामुळे फसवणूक झालेल्या भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी भाविकांच्या दर्शन प्रश्नासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
सरवणकर यांनी येथील पूजा साहित्य विक्रेत्याची एकत्रित बैठक घेऊन मोदक, पेढा प्रसाद आणि फुलहाराच्या एक समान दराबाबत चर्चा घडवून आणली आहे.
नूतन अध्यक्ष सरवणकर यांनी सर्व घटकांशी चर्चा करून विश्वासात घेत हा निर्णय केला आहे. भाविकांची कोणाकडूनही फसवणूक होऊ नये, त्यांना योग्य सेवा देता यावी, म्हणून आम्ही सर्व दुकानदारांनी एकमताने यापुढे सारखेचे मोदक किंवा पेढा विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व दुकानांसाठी एकसमान दर निश्चित झाले असून, त्याचे फलकही तयार आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. - अशोक खेडस्कर, कार्याध्यक्ष सिद्धिविनायक,
असे आहेत नवीन दर :
मलाई मोदक ६०० प्रति किलो काजू मोदक १,००० प्रति किलो स्पेशल मोदक ८०० प्रति किलो पेढा ६०० प्रति किलो बुंदी लाडू ४०० प्रति किलो बेसन लाडू ४८९ प्रति किलो मोतीचूर लाडू ३२० प्रति किलो खोपरा पेढा ४८० प्रति किलो साधा मोदक ४०० प्रति किलो मलाई पेढा ८०० प्रति किलो (नवीन दर अद्याप लागू केलेले नाहीत)