गर्भाशय कर्करोगाच्या उपचारांचे दुष्परिणाम कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:08 AM2021-09-24T04:08:11+5:302021-09-24T04:08:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - टाटा मेमोरियल रुग्णालयात २०११ पासून गर्भाशय ग्रीवाच्या कर्करोगाच्या उपचार पद्धतीवर अभ्यास सुरू होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - टाटा मेमोरियल रुग्णालयात २०११ पासून गर्भाशय ग्रीवाच्या कर्करोगाच्या उपचार पद्धतीवर अभ्यास सुरू होता. आता १० वर्षांनंतर रुग्णालय प्रशासनाला या उपचार पद्धतीत यश मिळाले आहे. त्यामुळे कर्करोगाच्या उपचारांचे दुष्परिणाम कमी होणार असून, रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या अभ्यासाचे आंतरराष्ट्रीयस्तरावरही कौतुक झाले आहे.
नव्या इमेज गाईडेड इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी गर्भाशय ग्रीवाच्या कर्करोगाच्या उपचाराचे दीर्घकालीन दुष्परिणाम कमी करते आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते. २०११ मध्ये टाटा मेमोरियल सेंटरमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी अभ्यास सुरू केला. रेडिएशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रगत आणि अत्यंत अचूक तंत्राची चाचणी केली, जसे की आतड्यांमध्ये होणारे दीर्घकालीन बदल कमी करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी इमेज गाईडेड इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी (आयजी आयएमआरटी) या अभ्यासाला मान्यता मिळाली आहे. तसेच, अलीकडेच जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी)मध्ये प्रकाशित झाली आहे. नव्या उपचार पद्धतीमुळे आतड्यात उशिरा होणारे मध्यम (४२% ते २१% पर्यंत) आणि गंभीर (९५.५% ते २.९%) दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात कमी झाले.
स्त्रीरोग कर्करोगासाठी प्रगत रेडिएशन तंत्राचा फायदा स्पष्ट करणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा पहिलाच अभ्यास आहे. या अभ्यासात सहभागी झालेले मुख्य लेखक प्राध्यापक सुप्रिया चोप्रा यांनी आधीच निकाल अमेरिकन सोसायटी फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी (एस्ट्रो) वार्षिक बैठक २०२० च्या क्लिनिकल ट्रायल्स सत्रात आणि २०२१ मध्ये सोसायटी ऑफ गायनकॉलॉजी ऑन्कोलॉजी, यूएसएच्या पूर्ण सत्रात सादर केले आहेत. कर्करोग व्यवस्थापनात अनेक नवीन तांत्रिक प्रगती अधिक प्रभावी असल्याचे मानले जाते.