अजित मांडके , ठाणे झोपडपट्टी आणि गेल्या काही वर्षात येथे नव्याने वसलेल्या इमारतींमुळे प्रभाग क्र. ६ ची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या प्रभागावर भोईर अॅण्ड कंपनीचा वरचष्मा जरी असला तरी या भागातील फुटपाथ हे फेरीवाल्यांनी गिळंकृत केलेले आहेत. सर्व्हीस रोडच्या दोनही बाजू देखील शोरुम आणि गॅरेजावाल्यांना आंदन म्हणूनच की काय? दिले गेले असल्याचे चित्र आहे. बसथांबा असून नसल्यासारखाच आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी मिनी स्टेडीअमचा नारळ फुटला खरा, परंतु आजही हे स्टेडीअम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रभाग तसा चांगला पण मुलभूत सुविधांच्या अभावामुळे टांगला असेच म्हणण्याची वेळ आली आहे. पूर्वी आगरी कोळी लोक संख्येनी बहरलेला प्रभाग म्हणूनही या प्रभागाची ओळख होती. सध्या या प्रभागाची लोकसंख्या १९ हजार ३७२ एवढी असून येथे मनोरमा नगर, श्रुती गार्डन, आबान पार्क, एव्हरेस्ट, गृहसंकुल, सुकुर गार्डन, प्राईड पार्क, पेस्टीसाईज कंपनी, ढोकाळी गाव, वर्धमान गार्डन, यशस्वी नगर, बाळकुम, अग्निशमन केंद्र, रॅमन अँड डॅम कंपनी आदींनी हा प्रभाग साकारला आहे. येथे संजय भोईर आणि त्यांच्या पत्नी उषा भोईर हे दाम्पत्य नगरसेवक आहे. ५६ सोसायट्या या भागात असून या सोसायटीमध्ये सुविधा असल्या तरी काही नव्याने तयार झालेल्या सोसायट्यांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
फुटपाथ झाले गायब, बसथाब्यांचा नाही ठिकाणा
By admin | Published: January 11, 2015 11:25 PM