सकल मराठा समाजाकडून आमदारांना घेराव, घरासमोर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 07:01 PM2020-11-02T19:01:58+5:302020-11-02T19:02:59+5:30
विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण घेण्यासाठी मराठा समाजातील युवक व युवतींना प्रवेशा देउन पदभरती सुरु करावी, यांसह विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
पुसद(यवतमाळ) : येथे सकल मराठा समाजातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांचा घरासमोर मंडप टाकून सोमवारी(ता.२) शांततापूर्वक घेराव घालून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. राज्य शासनाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे.त्यामुळे राज्यशासनाने न्यायालयीन लढा गंभिरपणे घेऊन आरक्षण पूर्ववत करावे. आरक्षणाचा नव्याने अध्यादेश काढून आरक्षण कायम करावे, आरक्षणाचा निर्णय त्वरीत घेऊन विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण घेण्यासाठी मराठा समाजातील युवक व युवतींना प्रवेशा देउन पदभरती सुरु करावी, यांसह विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
सारथी व अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर प्रतिनीधी नेमावा आदी मागण्यांच्या दृष्टीने राज्यशासनाचे व स्थानिक आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी पुसद येथील लोकप्रतिनीधी असलेल्या आमदार इंद्रनील नाईक यांना 'सकल मराठा समाजा'तर्फे घेराव घालून निवेदन दिले व या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली. दरम्यान आमदार इंद्रनील नाईक यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारुन मी स्वत: आरक्षणाच्या बाजूने असल्याचे सांगितले व यावेळी त्यांनी ना.अशोक चव्हाण यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून समाजबांधवांच्या भावना कळविल्या. चव्हाण यांनी सुद्धा समाजाच्या मागणीला पाठींबा असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापिठाकडे सदर प्रकरण पाठवून स्थगिती मिळविण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
लोकप्रतिनिधींना घेराव घालण्याचे विदर्भातील हे पहिलेच अभिनव आंदोलन असल्याने सर्व पुसद वासियांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले होते. मंगळवारी (ता.३) आमदार अॅड.निलय नाईक व आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांना घेराव घालण्यात येणार असून टप्प्या—टप्प्याने मंत्री, खासदार व उर्वरीत आमदार यांचे घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली.