गणपतीतून सामाजिक सलोख्याचे दर्शन, हिंदू, मुस्लीमधर्मीय आगत्याने बाप्पाचे करतात स्वागत, पूजा, आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 01:17 PM2023-09-13T13:17:13+5:302023-09-13T13:19:19+5:30

Ganesh Mahotsav: विविध भाषिक, प्रांतिक व धार्मिक लोकांना एकरूपात सामावून घेणारे शहर अशी ओळख असलेले मुंबई शहर या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी सज्ज होत आहे.

Sight of social harmony through Ganapati, Hindu, Muslim pilgrims welcome Bappa, Puja, Aarti | गणपतीतून सामाजिक सलोख्याचे दर्शन, हिंदू, मुस्लीमधर्मीय आगत्याने बाप्पाचे करतात स्वागत, पूजा, आरती

गणपतीतून सामाजिक सलोख्याचे दर्शन, हिंदू, मुस्लीमधर्मीय आगत्याने बाप्पाचे करतात स्वागत, पूजा, आरती

googlenewsNext

- मनाेज गडनीस
मुंबई : विविध भाषिक, प्रांतिक व धार्मिक लोकांना एकरूपात सामावून घेणारे शहर अशी ओळख असलेले मुंबई शहर या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी सज्ज होत आहे. विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनासाठी आता मुंबई शहर सजू लागले आहे. भायखळा, मशिद बंदर, वांद्रे, वरळी, गोवंडी, मानखुर्द अशा विविध भागांचे या दहा दिवसांतील वैशिष्ट्य सांगायचे तर हिंदू व मुस्लीमधर्मीय अतिशय आागत्याने, आनंदाने व एकत्रितपणे येत मनोभावे गणरायाचे पूजन करतात. 

गोवंडीतील अन्वर कुरेशी या रहिवाशाने सांगितले की, आमच्या विभागाच्या मंडळात मी व माझे मित्र लहानपणापासून आनंदाने सहभागी होतो. मंडळातर्फे आम्हाला दिली जाणारी सर्व कामे व जबाबदाऱ्या आम्ही पार पाडतो. कोविड काळामध्ये दोन वर्षे सर्व काही बंद होते. मात्र, गेल्यावर्षीपासून पुन्हा एकदा आम्ही गणेशोत्सवाचा आनंद साजरा करत आहोत. वरळी परिसरात राहणारे हमीद अन्वर तर गेली अनेक वर्ष त्यांच्या मंडळातील गणपतीची आरास सजविण्यासाठी पहाटे दादरच्या फूल बाजारात जाऊन ताजी फुले घेऊन येतात. तर रोषणाईच्या कामामध्येदेखील सेवा म्हणून काही व्यावसायिक आपल्याकडील साहित्य विनामूल्य देतात. 

वांद्रे पाली हिलजवळच्या भागात असलेल्या छोट्या वाड्यांमध्येदेखील सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते. तिथे ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. जितक्या उत्साहाने येथे ख्रिसमस साजरा होतो तितक्यात उत्साहाने आम्ही गणपती बाप्पाचेही स्वागत करतो, असे निलोफर याने सांगितले. 
दरम्यान, मुंबईचे हे अनोखे रूप नेहमीच उत्सवाबरोबरच संकट काळातही दिसून येते. हे वारंवार सिद्ध झाल्याचे यानिमित्ताने अनेकांनी सांगितले.

आकर्षण सलमानच्या गणपतीचे
बॉलीवूडकरही गणपती मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दहा दिवसांत अभिनेता सलमान खान याच्या घरच्या गणपतीची व आकर्षक रोषणाईची हमखाच चर्चा असते. सलमान खान याची लहान बहीण अर्पिता हिच्या आग्रहावरून सलनानच्या वांद्रे कार्टर रोडवरील गॅलेक्सी इमारतीमध्ये गणपती बसविला जातो. गेल्या २२ वर्षांपासून सलमान घरी गणपती बसवत आहे. या निमित्ताने बाप्पाची आरती करताना सर्व कुटुंबीय व बॉलीवूडमधील अनेक स्टार सलमानच्या घरी आवर्जून उपस्थित असतात. 

गणपती मंडळ आणि इफ्तारी
मुंबईत स्थायिक मुस्लीम समाज जितक्या उत्साहाने गणपती उत्सव साजरा करतो तितक्यात उत्सवाने रमजानच्या महिन्यात इफ्तारी साजरी करण्यातही मुंबईची काही गणेश मंडळे पुढाकार घेताना दिसतात. फॅशन स्ट्रीट परिसरात असलेल्या गणेश मंडळातर्फे इफ्तारीच्या दरम्यान तेथील मुस्लीमधर्मीय व्यावसायिकांसाठी आवर्जून इफ्तारीचे आयोजन केले जाते.

लालबागच्या राजाचे नागपाड्यात शाही स्वागत
मुंबईकरांच्या अभिमानाचा मानबिंदू असलेला लालबागचा राजा ज्यावेळी विसर्जनासाठी नागपाडा येथे पोहोचतो तेव्हा तेथील मुस्लीम समुदायातर्फे जोरदार स्वागत केले जाते. तसेच, सोबत असलेल्या भाविकांना शाही सरबतही दिले जाते.

Web Title: Sight of social harmony through Ganapati, Hindu, Muslim pilgrims welcome Bappa, Puja, Aarti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.