मनोज मोघे
मुंबई : लंडनमधील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांकरिता वाघनखे आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मुंबईहून रवाना झाले. याविषयीचा सामंजस्य करार उद्या (बुधवारी) लंडन येथे पार पडणार असून त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी ही वाघनखे महाराष्ट्रात येणार आहेत.
मुंबईकरांना २०२५ मध्येच वाघनखांचे दर्शन
वाघनखे सातारा येथील वस्तुसंग्रहालयातून १५ ऑगस्ट २०२४ राेजी नागपूर येथील सरकारी वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर वास्तुसंग्रहालयात १५ एप्रिल २०२५ रोजी आणली जाणार आहेत. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पुन्हा ही वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये रवाना होणार आहेत.
१५ नोव्हेंबरला करार अन् १६ नोव्हेंबरला वाघनखे मुंबईत येणार
सामंजस्य करारानंतर संबंधित म्युझियमकडून ही वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी मूल्यांकन करण्यात येणार असून खर्च सरकारला कळवला जाईल.
२५ ते ३० ऑक्टोबरपर्यंत विम्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतरच करारनाम्याचा मसुदा तयार करून म्युझियमकडून राज्य सरकारला पाठविण्यात येईल.
१५ नोव्हेंबर रोजी अंतिम करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात येणार असून १६ नोव्हेंबर रोजी या वाघनखांचे मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे.