Join us

हार्बरवर सिग्नल बिघाड; चाकरमान्यांना बसला फटका

By admin | Published: June 02, 2016 2:27 AM

मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेला बिघाडांच्या समस्यांनी ग्रासले असतानाच आता यात हार्बरही मागे राहिलेली नाही.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेला बिघाडांच्या समस्यांनी ग्रासले असतानाच आता यात हार्बरही मागे राहिलेली नाही. बुधवारी संध्याकाळी हार्बर मार्गावरील वडाळ्याजवळील रावळी जंक्शन येथे सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी सिग्नलमध्ये बिघाड झाला आणि हार्बर सेवा तब्बल तीन तास विस्कळीत झाली. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. रावळी जंक्शन येथे संध्याकाळी ५.२५ वाजता सिग्नलमध्ये बिघाड झाला. हा बिघाड होताच सीएसटी ते वडाळा आणि कुर्ला दरम्यानची अप आणि डाऊनची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. बिघाड त्वरित दुरुस्त होईल असे वाटत असणाऱ्या प्रवाशांना मात्र बरीच प्रतीक्षा करावी लागली. बिघाड दुरुस्त होईपर्यंत हार्बरचे वेळापत्रकच बिघडले. हार्बरच्या प्रवाशांना तर स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले. सिग्नलमधील बिघाड दुरुस्त होण्यास जवळपास एक तास लागला. बिघाड दुरुस्त झाल्यानंतरही लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावत होत्या. स्थानकाबाहेर येऊन रिक्षा आणि टॅक्सी सेवेचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना चालकांनी जास्त भाडे आकारून चांगलेच लुटले. कुर्ला स्थानकाबाहेर तर नवी मुंबईला जाण्यासाठी रिक्षाचालकांकडून तब्बल २00 रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारले जात होते. रात्री नऊ वाजेपर्यंत हार्बरवरील लोकल या उशिरानेच धावत होत्या.हार्बर विस्कळीत : सिग्नल यंत्रणेजवळ एका अज्ञात व्यक्तीकडून कचरा जमा करण्यात आला आणि त्या कचऱ्याला आग लावण्यात आली. त्यामुळे सिग्नलच्या केबलने पेट घेतला. याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग विझविली. या घटनेची गंभीर दखल घेत मध्य रेल्वेकडून अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे रात्री नऊ वाजेपर्यंत २५ लोकल फेऱ्या रद्द तर १५ फेऱ्या या अंशत: रद्द करण्यात आल्या.