Join us  

सिग्नल नियमांना तिलांजली

By admin | Published: February 24, 2016 1:47 AM

सीएसटी स्थानक परिसरात एका लोकलने रेड सिग्नल असतानाही सिग्नल ओलांडला आणि त्याचा फटका मध्य रेल्वेला बसल्याची घटना सोमवारी घडली. यात दोन लोकलची समोरासमोर टक्करही

मुंबई : सीएसटी स्थानक परिसरात एका लोकलने रेड सिग्नल असतानाही सिग्नल ओलांडला आणि त्याचा फटका मध्य रेल्वेला बसल्याची घटना सोमवारी घडली. यात दोन लोकलची समोरासमोर टक्करही झाली असती. या घटनेनंतर मोटरमनला तात्काळ निलंबित करण्यात आले. मात्र मध्य रेल्वे मार्गावर अशाप्रकारच्या वर्षाला सरासरी दहा घटना घडत असल्याची माहीती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अशा घटना घडल्यानंतर मोटरमनला लांब पल्ल्याच्या तसेच लोकल चालविण्यास तात्काळ बंदीही घालण्यात येते. सकाळी साडे सातच्या सुमारास सीएसटी हार्बरच्या दोन नंबर प्लॅटफॉर्ममधून वान्द्रेसाठी एक लोकल बाहेर पडत होती. त्याचवेळी याच प्लॅटफॉर्मध्ये जाण्यासाठी अंधेरीहून आलेल्या लोकलला रेड (लाल) सिग्नल दाखविण्यात आला होता. परंतु रेड सिग्नल असतानाही लोकलने धोकादायक रेषा ओलांडली. यानंतर लोकलच्या मोटरमनला निलंबित करण्यात आले. याबाबत रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,मुंबई विभागात वर्षाला जवळपास सरासरी अशा दहा घटना घडत आहे. त्यामुळे रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडत असून अपघाताचा धोकाही वाढत आहे. यात मोटरमनला निलंबित केले जाते. सिग्नल नियम मोडल्यास रेल्वेच्या मोटरमनला निलंबित करतानाच त्याला लांब पल्याच्या तसेच लोकल चालविण्यास बंदी घातली जाते आणि अशा मोटरमनला कारशेडमध्ये ट्रेनच्या शंटींगच्या कामाला लावण्यात येते. त्याचप्रमाणे त्याला मिळणारे सर्व भत्तेही रोखले जातात. यामुळे त्याचा पगारही कमी होतो. सोमवारी घडलेल्या घटनेतील मोटरमनलाही निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनाही अशाच प्रकारची शिक्षा देण्यात येईल, असेही अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.