Join us  

सिग्नल यंत्रणा ‘फेल’;लोकलही ‘लेट’; प्रवाशांची लटकंती; लोकलमधून उतरून गाठले पुढचे स्टेशन  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 8:26 AM

दुपारी सुरू झालेला लोकलचा हा गोंधळ सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या चाकरमान्यांनी लोकलच्या नावाने बोटे मोडली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील धिम्या मार्गावर मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास सीएसएमटीजवळ सिग्नल बंद पडल्यामुळे तब्बल पाऊण तास लोकल बंद पडल्या होत्या. अडीच वाजता बंद पडलेला सिग्नल सुरू होण्यास सव्वातीन वाजल्याने शेकडो प्रवाशांनी लोकलमधून खाली उतरून गतंव्य स्थान गाठण्यास सुरुवात केली होती.

मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच असून, रुळाला तडा जाण्यास ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी नजीक धिम्या मार्गावर सिग्नलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे भाखळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल अडकून पडल्या होत्या. एकही लोकल सीएसएमटी जात नसल्याने परतीच्या लोकलचा ४५ मिनिटांहून अधिक काळ पत्ता नव्हता. 

अखेर कंटाळलेल्या लोकल प्रवाशांनी लोकलमधून उतरून रुळावरून चालणे पसंत केले होते. दरम्यानच्या काळात रेल्वे स्थानकांवर यासंदर्भातील कोणतीच घोषणा किंवा कोणतीच माहिती दिली नव्हती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या गोंधळात आणखी भर पडत होता. 

बहुतांशी प्रवासी रेल्वे स्थानकांत लोकलची वाट पाहत उभे होते. दुपारी सुरू झालेला लोकलचा हा गोंधळ सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या चाकरमान्यांनी लोकलच्या नावाने बोटे मोडली होती. 

 

टॅग्स :मध्य रेल्वे