मुंबई : वाशी रेल्वे स्थानकात सिग्नल बिघाडामुळे शुक्रवारी सायंकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे अप- डाऊन मार्गावरील लोकल सेवा खोळंबल्या होत्या. ही घटना ऐन गर्दीचा वेळी घडल्याने कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्क लागला आहे. या घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार,वाशी रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेत शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल अप- डाऊन दिशेने जाणाऱ्या हार्बर मार्गवरील लोकल सेवा आणि ठाणे ते पनवेल अप- डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. परिणामी लोकलच्या एका मागोमाग एक रांगा लागल्याने गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे लोकल गाड्यामध्ये प्रवासी अडकून पडले होते.
या घटनेची माहितीने मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले. अवघ्या १६ मिनिटात हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. या घटनेचा परिणाम हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर रात्री उशिरापर्यत दिसून आला. सध्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्क लागला आहे.