Join us

सिग्नल यंत्रणेचे काम होणार प्रभावी; रेल्वे मार्गाची क्षमता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 4:28 AM

लोकल सेवेत आधुनिकता आणण्यासाठी ‘रेलटेल’सोबत करार

मुंबई : मेल, एक्स्प्रेसच्या सिग्नल यंत्रणेत नावीन्य आणण्यासाठी भारतीय रेल्वेने रेलटेलच्या सोबत करार केला आहे. भारतीय रेल्वेच्या ४ विभागांत आधुनिक ट्रेन नियंत्रण प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यामुळे सिग्नल यंत्रणेचे काम प्रभावीपणे होणे शक्य आहे. रेल्वे मार्गातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल. या यंत्रणेची उभारणी संपूर्ण भारतीय रेल्वेवर करण्याचा आशावाद रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.मॉडर्न ट्रेन कंट्रोल प्रणालीमुळे मेल, एक्स्प्रेसची वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि त्यामुळे रेल्वे मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी उपयोग होईल. यामुळे वेळेची बचत होईल. ही यंत्रणा भारतीय रेल्वे मार्गावरील सर्वात व्यस्त मार्गावर लागू करण्यात येईल. मध्य रेल्वे मार्गावरील नागपूर ते बडनेरा, दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर रेनिगुंटा ते येरगुंटला या मार्गावर बसविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षितसिग्नल यंत्रणेत आधुनिकीकरण करून यात लाँग टर्म इव्होल्यूशन (एलटीई) आधारित स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणालीचा समावेश करण्यात येईल. मोबाइल ट्रेन रेडिओ संचार प्रणालीची आवश्यकता असल्यास इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग केले जाईल. ही यंत्रणा उभी करण्यासाठी १ हजार ६०९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी २४ महिन्यांचा कालावधी लागेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या यंत्रणेमुळे संबंधित विभागाला फायदा झाल्यास संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

टॅग्स :भारतीय रेल्वे