महामार्ग दुरुस्तीसाठी स्वाक्षरी मोहीम, प्रवाशांचा जीव मुठीत धरुन प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:41 AM2018-08-26T03:41:45+5:302018-08-26T03:42:04+5:30
प्रवाशांचा उर्त्स्फूत प्रतिसाद : सायन-पनवेल मार्ग खड्डेमुक्त करण्याची मागणी
तळोजा : सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. खड्डे व रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
१२०० कोटी खर्च करून खड्ड्यांत गेलेल्या सायन-पनवेल महामार्गामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, दिवसेंदिवस या मार्गावर वाढणारे अपघात, वाहनांचे होणारे नुकसान, वाहतूककोंडी व त्यामुळे वेळेचे होणारे नुकसान या गंभीर बाबी लक्षात घेऊन डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाला अद्दल घडवण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय खानावकर यांनी या याबाबत आवाज उठवला असून, या विषयावर स्वाक्षरी मोहीम कळंबोली केएलई कॉलेज येथील हायवे शेजारी राबविण्यात आली. या मोहिमेत असंख्य नागरिक व प्रवाशांनी सहभाग नोंदविला. या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांबाबत अनेक सामाजिक व राजकीय मंडळींनी आवाज उठवला आहे. मात्र, तात्पुरती कुचकामी मलमपट्टी या मार्गावर करण्यात येते. प्रशासनाला या बाबत गांभीर्य जाणून देण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेचाच पर्याय आता शिल्लक असल्याने आता ही मोहीम राबविण्यात आली.