मनसेने दिले भाजपासोबत युती करण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 06:40 AM2020-01-07T06:40:46+5:302020-01-07T06:41:58+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची चर्चा आहे. आजवर शिवसेनेपासून शेकापपर्यंत सर्वच पक्षांना आम्ही मदत केली. पण, या सर्वांनी मनसेला किती मदत केली, त्याचा आम्हाला किती फायदा झाला हे तपासण्याची वेळ आली आहे. लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणे जुळू शकतात, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. मनसे आपल्या बहुरंगी झेंड्यात बदल करणार आहे. छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा स्वीकार करत प्राधान्याने केशरी किंवा भगव्या रंगाचा झेंडा स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली. या बदलामुळे मनसे आता हिंदुत्व स्वीकारून भाजपसोबत युती करणार का, अशा चर्चा सुरू झाली आहे.
यावर नांदगावकर म्हणाले, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रुही नसतो. त्यामुळे भविष्यात भाजप किंवा कोणत्याही पक्षासोबत समीकरणे जुळू शकतात. मात्र, सध्या असा कोणताही निर्णय झालेला नाही. मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीच्या चर्चेवर भाजपने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकूण मानसिकता वेगळी आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिन्न संस्कारातून तयार झालेले आहेत. शिवाय, मनसेचा भूतकाळ पाहता वर्तमानात तरी भाजपसोबत युतीची कोणती शक्यता नाही. मात्र, मनसेच्या धोरणात, विचारात काही बदल झाल्यास भविष्यात काहीही घडू शकते. सध्या तरी अशा समीकरणांची शक्यता नाही, असे भाजप प्रवक्ते, आमदार राम कदम यांनी सांगितले.
२३ जानेवारीला मेळावा
राज्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा बाणा जपणे अवघड जाणार आहे. ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी मनसेने आपल्या मूळ विचारधारेकडे परतावे, अशा प्रकारची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अद्याप याबाबत कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. २३ जानेवारीच्या पक्षाच्या मेळाव्यात याबाबत काही भाष्य होण्याची शक्यता आहे.