Join us

राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-काँग्रेस आघाडीचे संकेत

By admin | Published: September 22, 2014 12:33 AM

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजया उल्हास भुर्के यांना पराभूत करुन शेकापचे पनवेल येथील सदस्य अरविंद म्हात्रे हे विजयी झाले

जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकाप अशा आगळ्या आघाडीतून, रायगड जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रतोद महेंद्र दळवी यांनाच पराभूत करुन राष्ट्रवादी काँग्रेसचेच कर्जत तालुक्यातील नेरळ येथील सदस्य सुरेश टोकरे विजयी झाले आहेत. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजया उल्हास भुर्के यांना पराभूत करुन शेकापचे पनवेल येथील सदस्य अरविंद म्हात्रे हे विजयी झाले. परिणामी, येत्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपाला रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकाप अशी आघाडी होवू शकते, असे संकेत जिल्हा परिषदेच्या निकालाने दिले आहेत.अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार महेंद्र दळवी यांना मतदान करावे, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना व्हीप बजावण्यात आला होता. सेना आणि शेकापच्या सदस्यांना त्या त्या पक्ष प्रमुखांनी व्हीप बजावला होता, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी व्हीप जुमानला नाही. शेकापचे ज्ञानदेव पवार यांनीही व्हीप नाकारुन महेंद्र दळवी यांना मतदान केले. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या पत्नी जि.प.सदस्या कौशल्या पाटील यांनी टोकरेंना मतदान केले, मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडीत त्या तटस्थ राहिल्या.