मुंबई : मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांच्या वाटपावरून राजकीय पक्षात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. राज्यात आगामी लोकसभानिवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट असा सामना होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात लोकसभेच्या जागा वाटपावरून आतापासूनच चाचपणी सुरू आहे. यात मुंबईतील सहा जागांपैकी कोण कोणती जागा लढवणार याबाबत उत्सुकता आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसला मुंबईतील तीन जागा हव्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेला मुंबईत चार जागा हव्या आहेत. भाजपला मुंबईतील चार जागा लढवायच्या आहेत. मात्र, यापूर्वी शिवसेना- भाजप युतीमध्ये मुंबईत तीन-तीन असे समान जागा वाटप होते.
मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव असल्याचे समजते. मात्र, काँग्रेसने मुंबईत तीन जागांवर दावा केला आहे. उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबई या तीन जागा काँग्रेसला हव्या आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय निरुपम निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर येथून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे.
तीन जागा काँग्रेसला हव्या२००४, २००९, २०१४ आणि २०१९ पर्यंत मुंबईत लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यात काँग्रेस सहापैकी पाच जागा लढवत होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीत मुंबईत सहापैकी कमीत कमी तीन जागा काँग्रेसला हव्या आहेत.
चार जागांसाठी भाजप नेते आग्रहीमहायुतीमध्ये मुंबईत चार जागांसाठी भाजपचे नेते आग्रही आहेत. शिंदे गटाला राहुल शेवाळे खासदार असलेला दक्षिण मध्य मुंबई व गजानन कीर्तिकर खासदार असलेला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ घ्यावा आणि उर्वरित भाजपला मिळावेत, असा भाजपचा प्रयत्न आहे. यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघांचा समावेश आहे. या चारपैकी तीन मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार आहेत. तर दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. अजित पवार गटाची मुंबईत ताकद नसल्याने त्यांना येथे एकही मतदारसंघ सुटण्याची शक्यता नाही.