Join us

धावपळ-टेन्शन वाढण्याची ‘चिन्हे’

By admin | Published: October 05, 2014 9:16 PM

रात्र थोडी-सोंगे फार : पारंपरिक ‘ओळख’ सोडून लढणाऱ्या उमेदवारांची अग्निपरीक्षा

प्रगती जाधव-पाटील - सातारा- विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे इतका ‘टिष्ट्वस्ट’ आता आला आहे. प्रत्येक पक्षाने स्वबळाची भाषा केल्यामुळे संयुक्त पध्दतीतील उमेदवारांचा कस लागला आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी पक्षाने तिकीट नाकारल्याचे कारण पुढे करत अपक्ष लढणाऱ्यांबरोबरच प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविताना अडचण झाली आहे.प्रमुख पक्षांनी परस्परांना सोडचिठ्ठी देत आपली स्वतंत्र चूल मांडली. त्यामुळे जिथे नेहमी दुरंगी आणि तिरंगी लढत व्हायची अशा ठिकाणी आता चौरंगी आणि पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रस्थापित किंवा विद्यमान आमदारांना आपले पक्षचिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविणे फारसे अवघड राहिले नाही. पण जे पक्षाचा त्याग करून स्वतंत्र लढत आहेत, त्यांच्या पुढे आता हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत काँगेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली. यावेळी ते एकतर अपक्ष म्हणून लढत आहेत किंवा पक्ष बदलून भाजप किंवा शिवसेनेकडून रिंगणात आहेत. काँग्रेसच्या परंपरागत मतदारांना अजूनही अशा उमेदवारांचे काँग्रेसी चिन्हच माहीत आहे. त्यामुळे बदललेले चिन्ह पोहोचिवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी कार्यरत झाली आहे. पक्षांतर, बंडखोरीमुळे उद्भवलेल्या या प्रश्नावर मोठ्या कौशल्याने मात करण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत. कोपरासभा आणि प्रचारदौऱ्याच्या वेळी मतदारांच्या नजरेत भरेल अशा फ्लेक्सवर उमेदवाराचा चेहरा आणि शेजारी चिन्ह लावण्यात येत आहे. याबरोबरच प्रत्येक संपर्कदौऱ्यात मतदाराशी संवाद साधताना त्यांच्या नजरेला दिसेल आणि कानावर पडेल अशा बेतानेच चिन्हाचा प्रचार केला जात आहे.अनेक मतदारसंघांमध्ये सुमारे वीस वर्षांहून अधिक काळानंतर प्रादेशिक पक्ष स्वत:च्या चिन्हावर रिंगणात आहेत. पक्षाचे चिन्ह उमेदवारांच्या मनावर बिंबविण्यासाठी कोणी फुलांची मदत घेतेय तर कोणी बोर्डावर चित्र काढतेय. कधी नव्हे इतके लक्ष उमेदवारांना चिन्हांकडे द्यावे लागत आहे. पत्रकांवर मदारसुशिक्षित आणि तरूण मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी जाहिरात, फ्लेक्स आणि सोशल नेटवर्किंगचा उपयोग उमेदवार करत आहेत. पण ग्रामीण भागातील ज्येष्ठ मतदारांपर्यंत पोहोचणे सर्वांसाठी आव्हान आहे. वर्षोनुवर्षे एकाच पक्षातून एकाच चिन्हावरून निवडणूक लढविणाऱ्यांनी यंदा सवता सुभा मांडला आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे या मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रके प्रसिध्द केली आहेत. उमेदवाराच्या छायाचित्राशेजारीच त्यांचे चिन्ह छापल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश येत आहे.सोशल मीडियावरही अलर्टआता जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्ट फोन आल्यामुळे उमेदवारांना आपले चिन्ह पोहोचवणे सोपे झाले आहे. रोज सकाळी आणि रात्री प्रबोधन देणारे मेसेज आणि सोबत उमदेवाराचे छायाचित्र आणि चिन्ह याचे ‘प्रोजेक्शन’ सुरू झाले आहे. सुप्रभात ते शुभरात्रीपर्यंतचे मेसेज मतदारांच्या हातात पडत असल्यामुळे उमेदवारांनी या पर्यायाला पसंती दिली आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या या ‘अलर्ट’मुळे मतदारांचा उमेदवारांशी थेट ‘कॉन्टॅक्ट’ वाढला आहे. याचा पुरेपूर फायदा उमेदवार आणि मतदार दोघेही घेत आहेत.