मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाउनदरम्यान घरी बसलेल्या नागरिकांना धूमकेतू दिसण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि सूर्याच्या अतिजवळ असल्याने तो मुंबई आणि महाराष्ट्रातून कितपत पाहता येईल, याबाबत साशंकता असली तरी अद्यापही आशा मावळलेली नाही. कारण २५ मेनंतर स्वान नावाचा हा धूमकेतू परतीच्या वाटेवर असेल. त्यामुळे ही दुर्मीळ पर्वणी ठरणार असून संध्याकाळच्या आकाशात भारत, महाराष्ट्र आणि मुंबईतूनही स्वान दिसण्याची चिन्हे आहेत.
धूमकेतू स्वान सध्या मेष राशीत आहे. येणारे काही दिवस शक्यतो पहाटे ४.३० नंतर तो पूर्वेकडे दिसेल. स्वानचा अंदाजे तेजस्वीपणा म्हणजेच दृश्यमानता ५.६ आहे. आपण ६.० पर्यंत दृश्यमानता असलेले तारे नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. त्यामुळे अंधाऱ्या भागात हा धूमकेतू नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. शहरी भागात मात्र दुर्बिणीशिवाय दिसणे तसे कठीणच आहे, अशी माहिती वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राने दिली.
मुंबईतील आकाशात हा धूमकेतू पहाटेच्या वेळी क्षितिजाजवळ आहे. ढगाळ वातावरण आणि सूर्याच्या अतिजवळ असल्यामुळे त्याच्या दिसण्याबाबत साशंकता आहे. २५ मेनंतर स्वान परतीच्या वाटेवर जाऊ लागेल. त्यामुळे संध्याकाळच्या आकाशात दिसू लागेल.हा धूमकेतू सर्वात आधी २५ मार्च २०२० रोजी एसओएचओच्या सोलार विंड अॅनिसोट्रॉपीस इन्स्ट्रुमेंट स्वान कॅमेºयाने घेतलेल्या चित्रांमध्ये दिसला होता. म्हणून याला स्वान असे नाव देण्यात आले.लांब निळ्या शेपटीचे खगोलप्रेमींना आकर्षण- धूमकेतू सूर्यापासून खूप दूर असलेल्या थंड प्रदेशांमध्ये असतात.- सामान्यत: कायपरपट्टा आणि ऊर्टचे ढग हे धूमकेतूंचे स्रोत मानले जातात.- धूमकेतूंच्या अत्यंत लंबवर्तुळाकार कक्षा असतात, ज्याच्या आधारे त्यांचे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते.- स्वानला एक लांब निळी खगोलप्रेमींसह सर्वांनाच आकर्षित करू शकेल अशी शेपटी आणि हिरव्या रंगाचा विलक्षण कोमा आहे. त्यातील वायूंमध्ये असलेल्या विविध रसायनांमुळे हे रंग असावेत.- पण नेमक्या कोणत्या पदार्थ किंवा वायूंमुळे हा रंग मिळाला आहे, हे अद्याप खगोलशास्त्रज्ञांना समजले नाही.- हिरव्या रंगाचे धूमकेतू पाहायला मिळणे अत्यंत दुर्मीळ पर्वणी असून त्यामुळेच जगभरातील लोकांचे लक्ष याकडे लागले आहे.आॅस्ट्रेलियाने लावला होता शोधआॅस्ट्रेलियाचा हौशी खगोलशास्त्रज्ञ मायकेल मॅटियाझोने सर्वात आधी स्वानला शोधून काढले. जेव्हा एखादा धूमकेतू शोधला जातो तेव्हा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाचा सेंट्रल ब्यूरो फॉर अॅस्ट्रोनॉमिकल टेलिग्राम (सीबीएटी) त्याच्या नावाबाबत घोषणा करतो.तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतले दर्शनआॅस्ट्रेलिया येथील न्यू साऊथ वेल्समधील सिडनी येथे वास्तव्यास असलेले अमोल डी. माने यांनी तिथे स्वानची छायाचित्रे काढली आहेत. वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्राच्या माध्यमातून माने यांनी काढलेली छायाचित्रे खासकरून ‘लोकमत’ला पाठविली आहेत. १० मे रोजी सकाळी ५ वाजता स्वान ही छायाचित्रे काढण्यात आली. साध्या डोळ्यांनी स्वानला पाहता आले नसले तरी तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला पाहिल्याचे माने यांनी सांगितले.